जव्हार शहरानजिक बसचा समोरासमोर अपघात

या अपघातात नाशिक आगाराचे चालक व इतर २ प्रवासी यांना गंभीर प्रमाणात दुखापत झाली असून एकूण २८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना जव्हार येथील पतंगशाह उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

जव्हार: जव्हार – सेलवास मार्गावर जव्हारपासून २ की.मी. अंतरावर उताराचा घाट रस्ता असलेल्या प्रकाश पोल्ट्री, गोरठण फाट्याजवळ जयसागर डॅमच्या पुढे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक व जळगांव आगाराच्या बसचा सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात नाशिक आगाराचे चालक व इतर २ प्रवासी यांना गंभीर प्रमाणात दुखापत झाली असून एकूण २८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना जव्हार येथील पतंगशाह उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
जव्हारहून सेलवासकडे जाणारी नाशिक आगाराची एसटी बस आणि सेलवासकडून जव्हारच्या दिशेने येणारी जळगांव आगाराची बस वळणावर एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात २७ प्रवासी व १ बसचा चालक जखमी झाले असून त्यातील चालकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे बस चालकाला सेलवास येथे हलवण्यात आले.
सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. सुखी आणि आरामदायी प्रवास अशी लालपरीच्या ख्याती या अपघात मालिकेमुळे चाकरमानी प्रवास करणार्‍यांच्या मनात काहीसे संशयाचे जाळे निर्माण करत आहे. चालकांच्या बेदरकार वाहन चालवल्या मुळे सुखी प्रवास- सुरक्षित प्रवास या एस. टी. च्या घोषवाक्याला कुठेतरी हरताळ फासला जात आहे. अशी दररोज प्रवास करणार्‍या प्रवाशांनी बोलताना खंत व्यक्त केली.