विरार : विरार पूर्व मनवेल पाडा परिसरात खासगी बस वाहतूक व्यावसायिकांनी शेकडो बस उभ्या करून रस्ते गिळंकृत केले आहेत. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करवा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही या बस धारकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने स्थानिक रहिवाशी मेटाकुटीला आले आहेत.
विरार पूर्व मनवेल पाडा विवा वेदांता रस्त्यावर खासगी बस सेवा देणार्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. मुंबई, बोरीवली, मीरा भाईंदर या परिसरात त्याच्या बस उभ्या करण्यासाठी जागा दिल्या जात नसल्याने अनेक व्यावसायिकांनी आपल्या मोठ मोठ्या बस या ठिकाणी उभ्या करण्यास सुरूवात केली आहे. तीन ते चार किलोमीटर च्या परिसरात जवळपास २०० हून अधिक बस उभ्या केल्या जात आहेत. रस्त्याच्या दोनही बाजूला बस उभ्या असल्याने संपूर्ण रस्ता या व्यावसायीकांनी गिळंकृत करण्याचा प्रकार लावला आहे.
यात या बस धुण्याची, तसेच चालकांचे जेवण बनविण्याची, बस दुरुस्तीची कामे याच ठिकाणी रस्यावर केली जातात. यामुळे रस्ते निसरडे होऊन दुचाकीगाड्या घसरून अपघात होत आहेत. त्यात रात्रीच्या वेळी या बसच्या आड अनेक मद्यपी आणि नशापान करणारे आपले बस्थान मांडत आहेत. या मार्गावर रात्रीच्यावेळी अंधार असल्याने येथील रहिवाशांना विशेतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात वाहतूक पोलीस आणि परिवहन विभाग, महानगरपालिका यांच्याकडे अनेकवेळा स्थानिकांनी तक्रारी केल्या आहेत. पण अजूनही यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, याठिकाणी व्यावसायिकांचे आर्थिक संबध असल्याने कुणीही कारवाई करत नसल्याचे सांगितले.