विरार : वसई- विरार शहरातील रस्त्यांवर गेल्या अनेक दिवसापासून मोकाट गुरांचा संचार वाढला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे वाहनांच्या धडकेमुळे दररोज अनेक गुरांचा बळी जात असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
वसई- विरार शहरातील नागरिकांना भटक्या श्वानांबरोबर मोकाट जनावारांची समस्याही भेडसावू लागली आहे. महामार्गापासून अर्नाळा पर्यंतच्या रस्त्यावर, तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट गुरांचा मुक्त वावर सुरू आहे. ही मोकाट गुरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असतात. तर दुसरीकडे मोकाट गुरांच्या मलमूत्रांमुळे रस्त्यात दुर्गंधी पसरलेली असते. त्याचा उग्र वास स्थानिकांना तसेच वाहनचालकांना सहन करावा लागतो. त्याची स्वच्छता होत नसल्याने रोगराई पसरण्याशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असतो. या मोकाट गुरांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येमध्ये भर पडली आहे. यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
महामार्गावर देखील मोकाट गुरांचा संचार असल्याने वाहतूक कोंडी होत असते .यामुळे मुंबईत कामावर जाणार्या नागरिकांना विलंब होत असतो. मुंबई महामार्गावर अश्या मोकाट गुरांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तर काही ठिकाणी भीषण अपघात देखील झाले आहेत. यामुळे नागरिकांना होणार्या वाहतूक कोंडीला व त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे महापालिकेने गुरु ढोरे मोकाट सोडणार्या मालकांवर कारवाही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वसई- विरार शहरात दिवसाला १० ते १५ विविध जनावरांचा अपघातात मृत्यू होत असल्याची माहिती भारतीय पशु कल्याणचे मानद जिल्हा अधिकारी मितेश जैन यांनी दिली. त्यांना आम्ही स्वतः रुग्णवाहिकेत टाकून उपचारासाठी मुंबईच्या दिशेने घेऊन जातो. त्यात छोटे मोठे कुत्रे, मांजर, गाई, बैल, म्हैस यांचा समावेश असतो. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पशु वैद्यकीय रुग्णालय नसल्याने जखमी जनावरांना उपचारासाठी नाइलाजाने मुंबईच्या दिशेने घेऊन खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते असे,जैन यांनी सांगितले.