बोईसर: पालघर बोईसरमधील पश्चिम किनारपट्टीवरील दांडी, नवापूर , मुरबे या गावांच्या समुद्रकिनार्यावर रात्रीच्या सुमारास मेलेल्या माशांचा खच आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या परिसरातील समुद्रकिनार्यावर रात्री अचानक लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. दांडी ते नवापूर गावच्या समुद्र किनारी भोय व तरडी जातीच्या मृत माशांचा खच पडलेला आढळून आला आहे. या मृत माशांची संख्या जवळपास ३५ ते ४० हजार टनाच्या आसपास असल्याचे बोलले जात आहे. बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून निघणार घातक केमिकल युक्त रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडले गेल्याने हे मासे मेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार समुद्रात कारखान्यांचे केमिकल युक्त रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच सोडले जात असल्याने समुद्रातील जैवविविधतेसह परिसरातील गावांमधील नागरिकांच्या जीवाशीही तारापूर एमआयडीसीतील कारखाने खेळ करत असल्याचा समोर येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे .
विशेष म्हणजे तारापूर एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर पर्यावरण संरक्षण समिती यांची या गंभीरप्रश्नी उदासीनता आहे, की मुद्दामहून दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या शासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात अखिल भारतीय मच्छिमार कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. देशातील सर्वात मोठ्या व प्रदूषणाच्या बाबतीत प्रथम क्रमांक पटकावलेल्या तारापूर औद्योगीक क्षेत्रातील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषणकारी कारखान्यांना लावण्यात आलेल्या कोट्यवधीच्या दंडाच्या वसूलीस सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळवल्यानंतर आर्थिक फायद्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे जल प्रदूषण सुरुच असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. मागील दहा वर्षात या वाढत्या प्रदूषणामुळे अनेक वेळा पक्षी, मासे व म्हैशी, कुत्री अशा अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. परंतु या गंभीर जीव घेण्या समस्येकडे शासन, प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळ जानिवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचा आरोप केला जात आहे.
प्रतिक्रिया 1
पाहणी केली आहे. नमुने घेऊन दिल्लीला पाठवले आहेत.
– वीरेंद्र सिंग – उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
एम.आय.डी.सी मधील रासायनिक सांडपाणी विना शुद्धीकरण न करता समुद्रात सोडण्यात येत असल्यामुळे हा प्रकार घडला आहे.
– देवेंद्र दामोदर तांडेल, अध्यक्ष ,अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती