पालघरमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते, उड्डाणपूल,२५ प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

या बैठकीला नालासोपार्‍याचे आमदार क्षितिज ठाकूर आणि बोईसरचे आमदार राजेश पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.

वसईः वसई -विरार शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तब्बल सात नवीन रस्ते प्रकल्प प्रस्तावित असताना १२ नवीन उड्डाणपूल आणि चार पूर्व-पश्चिम भागांना जोडणारे उड्डाणपूल बांधण्याच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिल्याने आता प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका होण्यास मदत होणार आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सर्वसमावेशक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वसई तालुक्यात २५ प्रकल्प राबवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. आमदार ठाकूर यांची ही मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीए, एमएसआरडीसी , महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि महारेल या प्रकल्पांची अंमलबजावणी करणार्‍या संबंधित संस्थांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला नालासोपार्‍याचे आमदार क्षितिज ठाकूर आणि बोईसरचे आमदार राजेश पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.

मनोर-वाडा-आसनगाव या भागांना मुंबई-नाशिक समृद्धी महामार्गाला जोडणे, रेल्वे ओव्हरब्रिज, पूर्व-पश्चिम जोडणारे पूल आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी आर्थिक मदत या महत्त्वाच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. तब्बल सात नवीन रस्ते प्रकल्प प्रस्तावित असताना १२ नवीन उड्डाणपूल आणि चार पूर्व-पश्चिम भागांना जोडणारे ओव्हरब्रिज आता प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका करण्यासाठी उपयोगात येणार आहेत. औद्योगिक हब अशी ओळख असलेल्या परिसरात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नवघर खाडीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचा प्रकल्प हा अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, भाईंदर आणि नायगावमध्ये प्रस्तावित असलेल्या रो-रो सेवेचाही मार्ग मोकळा होणार आहे.

आम्ही आगामी पावसाळा लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांची यादी दिली आहे. वसई तालुक्यातील नागरिकांना एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत बिनदिक्कतपणे प्रवास करता येईल, यादृष्टीने हे सर्व प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. सरकारकडून आम्ही केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या तर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगाचे होईल, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. हे प्रकल्प तालुक्यातील वाहतूक अधिक सुरळीत करतील तसेच मुंबई महानगर प्रदेशातील शेवटच्या मैलापर्यंतच्या कनेक्टिव्हिटीला चालना देतील, असा विश्वास आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केला.