पालघरः बालमजुरीविरोधात कायदा कडक करूनही देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपर्यात बालमजुरीच्या घटना घडताना दिसत आहेत.कारण पालघर तालुक्यातील नगावे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरु असून त्याठिकाणी खोदकाम करण्यासाठी एक अल्पवयीन मुलाला कामावर ठेवले असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.ग्रामपंचायत कार्यालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरु असून त्याठिकाणी एक दहा ते बारा वर्षांच्या मुलाकडून पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डा खोदण्याचे काम करण्यात आले. सदर वार्ताहराने मुलासोबत काम करत असलेल्या कामगाराला याबाबतीत विचारणा केली तेव्हा हा मुलगा त्याच्या काकासोबत मदतीला आहे. त्याला कामाला लावलेले नाही, असे उत्तर त्याने दिले. ग्रामसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
पालघर येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी आलेल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे याप्रकरणी लक्ष वेधले असता त्यांनी गंभीर दखल घेत अधिकार्यांना चौकशी आदेश दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनीही तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
०००
हा प्रकार माझ्या कानी आला असून मी तात्काळ चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.
—आदिती तटकरे, मंत्री, महिला व बालकल्याण
०००
याप्रकाराची माहिती मिळताच मी आमच्या पोलीस अधिकार्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल.
—नीता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर