घरपालघरअवघ्या पाचशे रुपयात कोवळ्या मुलांची मजुरीसाठी खरेदी; जव्हार, भिवंडीमधील बालवेठबिगारीच्या घटना उजेडात

अवघ्या पाचशे रुपयात कोवळ्या मुलांची मजुरीसाठी खरेदी; जव्हार, भिवंडीमधील बालवेठबिगारीच्या घटना उजेडात

Subscribe

जव्हार येथील मुलगी आणि भिवंडी तालुक्यातील दोन मुलांना वेठबिगारीतून श्रमजीवी संघटनेने मुक्त केले असून तीन वेगवेगळ्या गुन्ह्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत

मोखाडा (ज्ञानेश्वर पालवे) : गेले महिनाभर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेने मालक सावकारांची आणि मुले खरेदी करून त्यांना राबवणाऱ्या धनगरांची पार दाणादाण उडवली आहे. या सावकारी वृत्तीच्या लोकांनी ठाणे, नाशिक, पालघर जिल्ह्यातील गरीब कातकरी मजुरांच्या दारिद्र्य आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या कोवळ्या बालकांना पाचशे ते एक हजार रुपये रुपये देऊन अक्षरशः गुलाम म्हणून खरेदी केले होते. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील या घटना ताज्या असतानाच जव्हार येथील मुलगी आणि भिवंडी तालुक्यातील दोन मुलांना वेठबिगारीतून श्रमजीवी संघटनेने मुक्त केले असून तीन वेगवेगळ्या गुन्ह्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

जव्हार तालुक्यातील धारणहट्टी येथील मनिषा नरेश भोये (८) व काळू नरेश भोये (६) या दोघी अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील मेंढपाळ पुंडलिक कांदाडकर, देवराम कांदाडकर याच्याकडे बालमजुरी करत होत्या. मनिषा तीन वर्षांपासून तर काळू एक वर्षांपासून बालमजुरी करत होती. मनिषाला पुंडलिक यांने दिनांक १७ तारखेला शिरपामाळ जव्हार येथे सोडले.

- Advertisement -

या घटनेची माहिती श्रमजीवीचे रवींद्र वाघ यांना मिळताच संघटनेचे कार्यकर्ते या प्रकरणात पुढे आले. मनिषाच्या वडिलांना कांदाडकर यांनी मनिषाच्याचे मजुरीचे वर्षाला १२ हजार आणि एक मेंढी असे ठरवले होते. परंतु सुरवातीला ५०० रुपयांव्यतिरिक्त काहीही दिलेले नाही. यामालकाने मनिषाला शेण भरणे , लेंड्या साफ करणे, दुध काढणे मेंढ्यांबरोबर फिरणे, पाणी आणणे, पाजणे मेंढ्या व गाईची सफाई करणे अशी अनेक कामे देऊन राबवून घेतले. याबाबत जव्हार पोलीस ठाण्यात श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. यात मनीषाची बहीण काळू नरेश भोये ही अद्यापही बेपत्ता असून तिचाही शोध सुरु आहे. श्रमजीवी संघटनेने तातडीने रेशनकार्ड मिळवून दिले.

भिवंडीतील वडवली खोताचा पाडा येथील संगीता पवार या कातकरी महिलेने तक्रार दाखल केली आहे. राहुल नावाच्या आपल्या १७ वर्षीय मुलाला कर्जत तालुक्यातील ताजू येथील भिवा गोयकर या मेंढपाळाने वेठीबिगार म्हणून ठेवले असल्याचे तिने सांगितले. मालक भिवा राहुलला खूप त्रास शिवीगाळ करायचा,खूप काम करून घ्यायचा. अखेर मालकाच्या जाचाला कंटाळून राहुल घरी परतला. श्रमजीवी संघटनेने लहान मुलांच्या बांधबिगारीला पुन्हा एकदा उजेडात आणल्याने संगीता पवार हिने देखील पुढे येत मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

भिवंडीमधील वाफाळे सगपाडा येथील सीता रामू वाघे या कातकरी महिलेने देखील आपल्या १२ वर्षीय मुलाच्या अरुण वाघेच्या बालमजुरी आणि वेठीबिगारीची तक्रार दिली आहे. गरिबी आणि अज्ञान याचा गैरफायदा घेत संभाजी खताळ या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील मेंढपाळाने या १२ वर्षाच्या अरुणला मजूर म्हणून ५०० रुपये देऊन एक प्रकारे विकत घेतले. तिकडे नेऊन या मुलाकडून कामे करून घेतली आणि जसे हे बालमजुरी, वेठीबिगारी प्रकरण श्रमजीवी संघटनेने उजेडात आणल्यानंतर संभाजीने अरुणला घरी आणून सोडून दिले.

या दोनही प्रकरणात पडघा पोलीस ठाण्यात बालकामगार प्रतिबंधक अधिनियम १९८६ आणि बंधबिगार पद्धतीचे (उच्चाटन) अधिनियम १९७६ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ऍट्रॉसिटी)च्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी स्वतः अहमदनगर, नाशिक, जव्हार इत्यादी ठिकाणच्या पीडित कुटुंबांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. गेले अनेक दिवस पंडित स्वतः याप्रकारणांकडे लक्ष ठेऊन आहेत. कातकरी कुटुंबं गरिबी आणि अज्ञानामुळे या अत्याचाराला बळी पडत आहे. म्हणूनच सर्व कार्यकर्त्यांनी कातकरीवाडीवर जाऊज कातकरी कुटुंबाचे अश्रू पुसण्याचे काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर- 21 येथील जलवायु विहार मध्ये भिंत कोसळून, 4 जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -