घरपालघरचिमाजी आप्पांच्या स्मृतीशिल्पाची दुरावस्था

चिमाजी आप्पांच्या स्मृतीशिल्पाची दुरावस्था

Subscribe

७ दिवसात या स्मृतीशिल्पाची डागडुजी न केल्यास स्वखर्चाने या स्मृतीशिल्पाची दुरुस्ती करणार असल्याचा इशारा युवासेनेचे अतुल काकासाहेब मोटे यांनी दिला आहे.

वसईः  वसई किल्ल्यावर चिमाजी अप्पांनी विजय मिळविल्यानंतर त्यांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी म्हणून  वसईची ओळख आहे. वसईमध्ये आल्यानंतर पर्यटक आणि नागरिकांचे स्वागत करण्यासाठी वसई पश्चिम-पूर्व जोडणाऱ्या अंबाडी पुलाजवळ एक स्मृतीशिल्प लावण्यात आले आहे. तसेच, चिमाजी आप्पांचा पुतळादेखील याठिकाणी आहे. मात्र येथील स्मृतीशिल्पाची मागील  कित्येक वर्षांपासून दुरावस्था झाली असताना देखील महापालिका डागडुजी करत नसल्याने आता युवासेना आक्रमक झाली असून येत्या ७ दिवसात या स्मृतीशिल्पाची डागडुजी न केल्यास स्वखर्चाने या स्मृतीशिल्पाची दुरुस्ती करणार असल्याचा इशारा युवासेनेचे अतुल काकासाहेब मोटे यांनी दिला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार वसई-विरार महापालिका शहर सौंदर्यीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, वसईकरांचा अभिमान असलेल्या नरवीर चिमाजी आप्पा यांच्या स्मृतीशिल्पाकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतो आहे. वसई-पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावरील चिमाजी आप्पा यांच्या स्मृतीशिल्पाची दुरवस्था झाली आहे. शेजारीच असलेल्या उद्यानाची देखील महापालिका देखभाल करत नसल्याचे आढळून आले आहे.  पोर्तुगीजांच्या जाचातून वसईला मुक्त करण्यासाठी ज्या वीरपुरुषांने दोन वर्ष लढा दिला आणि वसईला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त केले अशा  वीरपुरुषांच्या स्मृतिस्थळांची अशापद्धतीने दुरवस्था होत असेल तर महापालिका करते काय? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येतो आहे. या स्मृतीस्थळाची येत्या सात दिवसांत दुरुस्ती व पुनर्बांधणी करावी, अशी मागणी युवासेनेचे अतुल मोटे यानी केली आहे. अन्यथा स्वखर्चाने या स्मृतीस्थळाची दुरुस्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -