चायनिज, पाणीपुरी-भेळपुरी व्यवसायाचा गाडा रुतलेलाच

चायनिज, पाणीपुरी-भेळपुरी या छोटेखानी व्यवसायाचा गाडा पूर्वपदावर येत नाही, तोच नव्या निर्बंधांमुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे.

चायनिज, पाणीपुरी-भेळपुरी या छोटेखानी व्यवसायाचा गाडा पूर्वपदावर येत नाही, तोच नव्या निर्बंधांमुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे. परिणामी पालघर तालुक्यातील लघुव्यावसायिक आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कारागिरांपुढे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील १५ महिन्यांपासून कोरोनाने देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यात थैमान घातले आहे. गतवर्षी लॉकडाऊनमुळे तब्बल चार ते पाच महिने लहान – मोठे सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प होते. अनलॉकनंतर ऑक्टोबर अखेर व्यवसाय पूर्वपदाच्या दिशेने वाटचाल करीत असताना याही वर्षी मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाने कहर केला. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे तब्बल दीड महिना बाजारपेठेसह सर्वच लघु व्यवसाय ठप्प होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. व्यवसाय रात्री ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. यानंतर २१ जूनपासून सर्वच व्यवसाय पूर्णक्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली. आठवडाभरापासून या व्यवसायाचा गाडा पूर्वपदावर येत नाही तोच डेल्टा प्लस हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून २८ जूनपासून पुन्हा निर्बंध लादण्यात आले. पालघर जिल्ह्यात दुपारी ४ वाजेपर्यंतच व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे पाणीपुरी, चायनीज व इतर खाद्यपदार्थांची सायंकाळनंतर विक्री करणाऱ्या लघु व्यावसायिकांवर पुन्हा एकदा संकट ओढवले आहे.

पाणीपुरी, भेळपुरी, चायनीज खाद्यपदार्थ विक्रीची वेळ सायंकाळनंतर रात्री १० ते १०.३० वाजतापर्यंत असते. पालघर तालुक्यात २५० ते ३५० च्या जवळपास व्यावसायिक असून यावर अवलंबून असलेल्या कारागिरांची संख्या ५०० च्या वर आहे. नव्या निर्बंधामुळे लघुव्यावसायिकांसह या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कारागिरांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. शासनाने नियमांच्या अधीन राहून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी विक्रेत्यांकडून मागणी होत आहे.

तिसऱ्या लाटेचे सावट कायमच

कोरोना संसर्गामुळे वर्षभरापासून पाणीपुरी-भेळपुरी व इतर खाद्य पदार्थाची हातगाडीवरून विक्री करणारे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरअखेर हा व्यवसाय पूर्व पदावर आला असतानाच यावर्षीही कोरोनाने थैमान घातले आणि पुन्हा हा व्यवसाय ठप्प झाला. आता तिसऱ्या लाटेचे सावट कायम आहे. त्यामुळे व्यवसाय करण्यास कुठलाही वाव राहणार नाही. त्यामुळे आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न एका व्यावसायिकाने उपस्थित केला.

अनेकांनी सोडले शहर, तर उर्वरीत जाण्याच्या प्रयत्नात

पालघर तालुक्यात ३५० च्या जवळपास पाणीपुरी-भेळपुरी विक्रेते असून बहुतांश परप्रांतीय आहेत. येथे भाडे तत्त्वावर हे व्यावसायिकआणि कारागीर राहतात. वर्षभरापासून या व्यवसायाची आर्थिक घडी पूर्णत: विस्कटली आहे. या व्यवसायाचा गाडा आठवडाभरापूर्वी पूर्वपदावर येत नाही, तोच नव्या निर्बंधांमुळे या व्यवसायावर गंडांतर आले आहे. त्यामुळे अनेकांनी सफाळे, केळवे, पालघर, बोईसर शहर सोडले तर काहींनी शहर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा –

शिवसेनेने मच्छीमारांना वाऱ्यावर सोडले; विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आरोप