विरार : पालघर जिल्ह्यात वारंवार वातावरणात अचानक बदल घडून पावसासारखे ढगाळ होत असल्याने फळबाग उत्पादक शेतकर्यांच्या चिंता वाढल्या आहेत . या वातावरणामुळे आताच मोहोर धरलेल्या झाडांचा मोहोर गळू लागला आहे किंवा झाडावरच करपून जाण्याची शक्यता असल्याने एकूणच फळांची धारणा कमी होऊन उत्पादन घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे . पालघर जिल्ह्यात यंदा ऐन थंडीच्या मोसमात वातावरणात वारंवार आणि अमूलाग्र बदल घडत आहे . डिसेंबर महिन्यात चांगलाच सुखद जोर धरलेल्या थंडीत शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला होता .तर थंडी ही गायब झाली होती.बंगालच्या उप सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा हा परिणाम असल्याचे तेव्हा हवामान खात्याने स्पष्ट करून पुढे पुन्हा थंडी सक्रिय होईल असे भाकीत केले होते.
त्याप्रमाणे वर्षाच्या सुरूवातीला आकाश निरभ्र होत थंडीचा जोर वाढू लागला असतानाच रविवारी सकाळपासून आकाशात चक्क पावसासारखे आठवड्याभरात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने आंबा , चिक्कू , चिंच आदी फळबागांसह शेवगा सारख्या झाडांवरील चांगला बहरलेला मोहोर गळू लागला आहे .जर पुढेही असेच वातावरण बदल होत गेले तर धरलेला मोहोर करपून जाण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवत आहेत. यामुळे मागील सालाप्रमाणे फळांचे उत्पादन घटण्याची किंवा फळधारणेला उशिर होऊन हंगाम पावसात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. याबरोबरच आताच्या रब्बी हंगामातील वाल, चणा, तूर, मूग, उडीद, राई आदी कठवळ पिकांवर सुद्धा बदलत्या वातावरणाचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता शेतकरी बोलत आहेत.