घरपालघरडहाणू तालुक्यात सीएनजीचा तुटवडा; बोईसरचे केंद्र वापीला स्थलांतरीत

डहाणू तालुक्यात सीएनजीचा तुटवडा; बोईसरचे केंद्र वापीला स्थलांतरीत

Subscribe

सीएनजी गाड्यांची वाढती संख्या पाहता डहाणू तालुक्यात मुंबई-अहमदाबाद हायवेवरील एकमेव सीएनजी पंप अपुरा पडत असल्याने सीएनजीचा तुटवडा जाणवू लागला आहे.

सीएनजी गाड्यांची वाढती संख्या पाहता डहाणू तालुक्यात मुंबई-अहमदाबाद हायवेवरील एकमेव सीएनजी पंप अपुरा पडत असल्याने सीएनजीचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच बोईसर येथे असलेले गुजरात गॅस केंद्र वापी येथे हलवण्यात आले आहे. तेथून सीएनजी आणावा लागत असल्याने सीएनजीचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे सीएनजीसाठी याठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहे. वाढत्या महागाईसोबत दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत आहे. अशात वाहनचालकांची सीएनजीसारख्या स्वस्त इंधनाला जास्त पसंती मिळत आहे. सध्या सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या इतर इंधनावरील वाहनांपेक्षा जास्त प्रमाणात वाढताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी सीएनजी फक्त गुजरातपर्यंतच सीमित होते. परंतु महाराष्ट्रात सीएनजीला ग्रीन सिग्नल मिळाल्यावर महाराष्ट्रात सीएनजी वाहनांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

सीएनजी भरण्यासाठी आम्हाला पेट्रोलपंपावर तास-तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यात वाहनांच्या रांगा महामार्गापर्यंत लागत असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. मुबलक प्रमाणात सीएनजी साठा उपलब्ध झाल्यास आमचा बराच वेळ वाचणार आहे.
– राजेश कासट, वाहनचालक

- Advertisement -

डहाणू तालुक्यातील एशियन पेट्रोलपंप हा महामार्गावरील वाहनांसाठी सोयीस्कर ठरत असून तालुक्यातील वाहनांसाठी एकमेव सीएनजी स्टेशन आहे. त्यामुळेच एशियन पेट्रोलपंपावर नेहमीच वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. सीएनजी भरण्यासाठी एशियन पेट्रोलपंपावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत असतात. एशियन पेट्रोलपंप येथे वापी येथील गुजरात गॅसच्या मुख्य सीएनजी केंद्रावरून सीएनजी आणून त्याचे वितरण केले जाते. पूर्वी सीएनजीचे मुख्य वितरक केंद्र बोईसर येथे असल्यामुळे सीएनजीचा तुटवडा भासत नव्हता. परंतु बोईसर येथील गुजरात गॅसचे केंद्र बंद झाल्यामुळे आता एशियन पेट्रोलपंपला सीएनजी आणण्यासाठी गुजरात गॅसच्या वापी येथील मुख्य केंद्रावर जावे लागते आहे.

गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी गुजरात गॅसच्या व्यवस्थापकांशी संपर्क करून चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरून डहाणू-बोईसर परिसरात मुख्य केंद्र उपलब्ध करता येईल. परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली आहे. एशियन पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागून अपघाताचा धोका वाढला आहे. येथे अपघात होऊन अनुचित प्रकार घडल्यास कारणीभूत असलेल्या लोकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे.
– कैलास चौरे, उपसरपंच, ग्राम पंचायत, चारोटी

- Advertisement -

गुजरात गॅसच्या वापी येथील मुख्य वितरण केंद्रावर वापी परिसरातील सर्व पेट्रोलपंपावरील वाहने सीएनजीसाठी येत असतात. त्यातच आता डहाणू तलासरी तालुक्यातील पेट्रोलपपांवरील वाहनेही वापी येथे सीएनजी घेण्यासाठी जात आहेत. त्यामुळे वापी येथील मुख्य केंद्रावर जास्तीचा भार पडत असून सीएनजी वितरणसाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळेच डहाणू तालुक्यातील उपकेंद्रांना सीएनजीचा तुटवडा भासत असून वाहनचालकांना सीएनजीसाठी लांबच्या लांब रांगा लावाव्या लागत असून तासंतास वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे डहाणू, तलासरी, बोईसर भागात सीएनजी वितरणासाठी गुजरात गॅसकडून मुख्य सीएनजी स्टेशन उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. एशियन पेट्रोलपंपावर सीएनजी भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या रांगा राष्ट्रीय महामार्गापर्यंत येत असतात. अशात आधीच अपघात प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर झालेल्या पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे. या ठिकाणी अपघात होऊन काही विपरीत घडल्यास ह्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

हेही वाचा –

गहू, हरभऱ्याचा हमीभाव वाढवण्याचा केंद्राचा निर्णय, नवीन MSP काय ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -