कोका कोला कंपनीच्या कामगारांचे आमरण उपोषण

कुडूस येथील कोका कोला कंपनी आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या कामगारांनी अन्यायाविरोधात कुटुंबासह वाडा तहसिलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

कुडूस येथील कोका कोला कंपनी आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या कामगारांनी अन्यायाविरोधात कुटुंबासह वाडा तहसिलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कोका कोला कंपनी प्रशासन व कंत्राटदार कामगारांबाबत मनमानी करत आहेत. कंत्राटदार कामगारांना कंपनी गेटवर बोलवतात व दमदाटी करुन मारण्याची धमकी देऊन हात पाय तोडण्याची भाषा करत हाकलून देतात. तरीसुद्धा कंपनी त्याविरोधात कुठलीही कारवाई करत नसल्याने कामगारांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

स्थानिक प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांना कंपनी व्यवस्थापन व कंत्राटदार जुमानत नाहीत. हुकूमशाही प्रमाणे कामकाज सुरु आहे. जुन्या कामगारांना कामावरुन काढून टाकत असतात. त्यांना महिन्याला २६ दिवस काम न देता कमी रेट प्रमाणे नवीन कामगारांना कामावर रुजू करत आहेत. गेली १५ ते २० वर्षे काम करत असलेले कामगार कंपनीमध्ये काम करुन आपला उदरनिर्वाह चालवत असताना कामगारांविरुद्ध षडयंत्र करून कंपनीतून कामावरून काढत आहेत. त्यांचे संसार रस्त्यावर आणत आहेत. पीएफ भरत नाही, पगार वेळेवर देत नाहीत, काम देत नाहीत, अशा कामगारांच्या तक्रारी आहेत.

आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कामगारांनी उपोषण केले होते. त्यावेळी कामगार आयुक्त, पोलीस निरीक्षक, आमदार यांच्यासमोर करार करण्यात आला होता. त्यालाही केराची टोपली दाखवण्यात आल्याची कामगारांची तक्रार आहे. मागील ६ महिन्यापासून नियमित वेळेवर पगार दिला जात नाही. सर्व मागण्या युनियन पदाधिकार्‍यांसमोर मान्य केल्या जातात. प्रत्यक्ष त्याची पूर्तता होत नाही. १५ वर्षे काम करुनसुद्धा कामावर घेतले जात नाही. त्यामुळे कामगारांनी सहकुटुंब आमरण उपोषण सुरु केले आहे. महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष जितेश पाटील, वाडा तालुका अध्यक्ष रविंद्र मेणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे. कामगारांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा जितेश पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा –

राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद