या महोत्सवातील स्पर्धक सुवर्णपदक पटकावतील

या महोत्सवातून पुढे आलेले स्पर्धक एक दिवस नक्कीच ऑलिंपिक स्पर्धांमधून रजत अथवा सुवर्णपदक देशासाठी मिळवून आणतील

वसई : तरुण पिढी एकीकडे मोबाईलच्या आहारी गेलेली दिसत असताना, मुंबईतील आधीच कमी असलेली मैदाने सुनी पडत असल्याचे दिसत आहे. ऐतिहासिक आणि नैसर्गिक पार्श्वभूमी लाभलेल्या वसईत हा असा प्रचंड व्याप्तीचा महोत्सव साजरा होतो, याचे कौतुक वाटते. या महोत्सवातून पुढे आलेले स्पर्धक एक दिवस नक्कीच ऑलिंपिक स्पर्धांमधून रजत अथवा सुवर्णपदक देशासाठी मिळवून आणतील, असा विश्वास यावेळी ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी बोलताना व्यक्त केला.
वसई विरार कला-क्रीडा महोत्सवाला सोमवारी संध्याकाळी वसईच्या नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर सुरुवात झाली. महोत्सवातील क्रीडा सामन्यांचे उद्घाटन नवतरुण रणजीपटू सरफराज खान याच्या हस्ते तर कला स्पर्धांचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. ६० हजार स्पर्धकांच्या सहभागाने आज सुरू झालेला हा एकूण ६९ प्रकारच्या कला आणि क्रीडास्पर्धांचा संयुक्त महोत्सव ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यंगस्टार ट्रस्ट, महोत्सव समिती अणि वसई -विरार महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जलतरणपटू शुभम वनमाळी, महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, आमदार क्षितिज ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव,प्रथम महापौर राजीव पाटील, माजी महापौर नारायण मानकर, प्रविण शेट्टी, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, वसई जनता बँकेचे अध्यक्ष महेश देसाई, वसई विकास बँकेचे अध्यक्ष आशय राऊत, बँकेचे माजी उपाध्यक्ष जगदीश राऊत उपस्थित होते. तर या महोत्सवाचे प्रणेते आमदार हितेंद्र ठाकूर हे अध्यक्षस्थानी होते.

१९९० मध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ३५०० स्पर्धकांच्या सहभागाने सुरू झालेल्या महोत्सवात यावर्षी कला व क्रीडा विभागात एकूण ६० हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही नोंद आधीच झालेली आहे. दोन वर्षांच्या कोविड ब्रेकनंतर हा महोत्सव पुन्हा एकदा सुरू होत असल्याने त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी महोत्सवात क्रीडा विभागात तिरंदाजी स्पर्धा या नव्या स्पर्धेचा समावेश करण्यात आला असून कला विभागात ’डान्स वसई डान्स’ ही बॉलीवूड गीतांवरील नृत्यांची स्पर्धा होणार आहे.
आमदार हितेंद्र ठाकूर यांनी, आता प्रारंभापासूनची कार्यकर्त्यांची पहिली पिढी वयोवृद्ध होत आली असून, महोत्सव समितीवर नव्या पदाधिकार्‍यांनी पुढे येऊन जबाबदारी घ्यावी. आमच्या हयातीत महोत्सवाची वाटचाल पुढे कायम ठेवण्यासाठी नियोजनाचे तंत्र समजावून घ्यावे, असे आवाहन केले. प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच तीन दशकांचा हा यशस्वी प्रवास शक्य झाल्याचे आ. ठाकूर यांनी आवर्जून सांगून, त्यांच्याप्रती कृतज्ज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.