वसईः वसई-विरार महापालिकेच्या ठेका पध्दतीवर कार्यरत मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्या नियमबाह्य नियुक्तीची तक्रार आता लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे. नियमबाह्य नियुक्ती आणि महापालिकेकडून खोटी व फसवणूक करणारी माहिती दिल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा सचिव अनिल चव्हाण यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे. डॉ. भक्ती चौधरी या सध्या वसई-विरार महापालिकेच्या ठेका पद्धतीवर मुख्य आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. ५ जून २०१३ रोजी ‘वैद्यकीय अधिकारी पदाच्या मुलाखतीदरम्यान त्यांनी महाराष्ट्र व इंडियन मेडिकल कौन्सिलचे आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते. मुलाखतीवेळी डॉ. भक्ती चौधरी यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसतानाही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. वैद्यकीय अधिकारी पदाच्या मुलाखती घेणार्या पॅनेलमध्ये महापालिकेचे तत्कालीन ठेका पध्दतीवर कार्यरत असलेले डॉ. सुनील वाडकर बोगस डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना १४ डिसेंबर २०२१ ला अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळच्या वैद्यकीय अधिकारी पदाच्या निवडीकडे आता संशयाने पाहिले जाता आहे.
डॉ. भक्ती चौधरी यांची नियमबाह्य नियुक्ती झाल्याने ती रद्द करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने चव्हाण यांनी महापालिकेच्या आस्थापना विभागाकडे पत्रव्यवहारही केलेला होता. या पत्राला उत्तर देताना आस्थापना विभागाचे उपायुक्त तानाजी नरळे, वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त विजयकुमार द्वासे यांनी कायदे व शासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. खोटी व फसवणूक करणारी माहिती देत डॉ. भक्ती दीपक चौधरी यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, असा चव्हाण यांचा आरोप आहे. उपायुक्त तानाजी नरळे, वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त विजयकुमार द्वासे यांनी कायद्याची पायमल्ली व शासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करत डॉ. भक्ती दीपक चौधरी यांना पाठिशी घालण्यासाठी खोटी व फसवणूक करणारी माहिती दिल्याने या दोघा अधिकार्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केलेली आहे. या मागणीसंदर्भात त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या अवर सचिव निकिता पांडे यांनाही पत्र दिलेले आहे. त्यानंतर अॅड. अनिल चव्हाण यांनी पुन्हा एकदा डॉ. भक्ती चौधरी यांच्यासह अन्य दोन अधिकार्यांच्या निलंबनाकरता लोकायुक्तांचा दरवाजा ठोठावला आहे.