सफाळेतील एसटी आगाराच्या बांधकामाला सुरुवात

दोन वर्षांपूर्वी एसटी आगारातील जुनी जीर्ण झालेली इमारत पाडण्यात आल्याने आगारात बसण्याची जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे केवळ पत्रे तुटलेल्या दोन शेडचा आधार घेत प्रवासी बसची वाट पाहत ताटकळत बसून असतात.

सफाळे: पालघर तालुक्यातील सफाळे येथे नव्याने एसटी आगाराच्या इमारतीच्या उभारण्याचे काम पाच वर्षांपासून प्रशासन व ठेकेदारांच्या उदासीनतेमुळे तसेच निधीअभावी रखडले होते. त्यामुळे एसटी आगारातील प्रवाशांची गैरसोय होऊन तुटलेल्या पत्र्यांच्या दोन शेडचा आधार घेत प्रवासी बसची वाट पाहत असायचे. मात्र अखेर आता रखडलेले बांधकाम सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात वरई, साखरे, दहिसर, नावझे, गिराळे, सोनावे, नवघर घाटीम, तर पश्चिम भागातील दातिवरे, कोरे, एडवण, उसरणी, भादवे, नगावे, निघरे, अंबोडे, दांडाखटाळी, आगरवाडी असे ५० ते ६० गावेपाडे आहेत. या गावातील गोरगरीब नागरिकांना सफाळे स्थानक व बाजारपेठेत येण्यासाठी एसटी बसचा आधार घ्यावा लागतो. दोन वर्षांपूर्वी एसटी आगारातील जुनी जीर्ण झालेली इमारत पाडण्यात आल्याने आगारात बसण्याची जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे केवळ पत्रे तुटलेल्या दोन शेडचा आधार घेत प्रवासी बसची वाट पाहत ताटकळत बसून असतात.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आजारी व्यक्ती आदींचे प्रचंड हाल होत आहेत. वर्षभरापासून एसटी आगाराच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. इमारतीच्या फाउंडेशनचे काम झाले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून निधीअभावी इमारतीचे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल होत असून आगारातील कर्मचार्‍यांनाही निवारा शेड नसल्याने हाल होत आहेत. केवळ काँक्रीटच्या फाउंडेशनचे काम केले होते. बांधकामासाठी लागणारा निधी उपलब्ध नसल्याने ठेकेदाराकडून हे काम बंद करण्यात आले होते. मात्र आता निधी उपलब्ध होताच इमारतीच्या बांधकामाला लागणार्‍या कॉलम उभारण्याच्या कामाला जलदगतीने सुरूवात करण्यात आली आहे.