मीरा भाईंदरमध्ये मॉडर्न आर्ट, पुतळे उभारण्यासाठी सल्लागार

नेमलेल्या सल्लागारामार्फत सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यासह इतर विविध उपाययोजना पालिकेकडून राबवल्या जाणार आहेत.

भाईंदर : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत शहराच्या विविध परिसरांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्याचे आदेश सप्टेंबर महिन्यात कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत प्रधान सचिवांकडून देण्यात आले होते. त्यानुसार मिरा-भाईंदर मध्ये पालिकेकडून भाईंदर पूर्व-पश्चिम उड्डाणपूल, काशिमिरा उड्डाणपूल, जैसल पार्क व जुने रेल्वे फाटक या परिसरात मॉडर्न आर्ट, टाकाऊ पासून टिकाऊ, पुतळे ह्यापासून सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी नेमके कोणत्या ठिकाणी काय करायचे जेणेकरून शहराचे सौंदर्य चांगले दिसेल याकरिता सल्लागार मार्फत नेमणूक करून काम करण्यात येणार आहे. ह्या अभियानांतर्गत मिरा-भाईंदर महापालिका शहाराच्या सौंदर्यीकरणात भर पडून चांगली कामगिरी करण्यासाठी सल्लागाराची मदत घेतली जाणार आहे. त्याच्या नियुक्तीच्या व आर्थिक खर्चाच्या प्रस्तावाला नुकतीच महापालिका आयुक्तांनी मंजूर दिली आहे. नेमलेल्या सल्लागारामार्फत सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यासह इतर विविध उपाययोजना पालिकेकडून राबवल्या जाणार आहेत.

मिरा-भाईंदर शहराच्या सौंदर्यीकरणात भर पाडण्यासाठी हे काम चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टीने जागा निश्चित करणे, संबंधित विभाग प्रमुख संपर्क करून आराखडा तयार करणे, अंदाजपत्रक तयार करणे, सादरीकरण करणे ह्यासाठी सल्लागाराची मदत घेण्यात येणार आहे. ह्यावर मोठया प्रमाणावर खर्च देखील होणार आहे. त्यामुळे तसा प्रस्ताव पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. त्याला महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.

चौकट

क्लस्टर योजनेसाठी सुद्धा नेमणार सल्लागार

मिरा-भाईंदर पालिका हद्दीत समूह विकास (क्लस्टर) योजना राबविण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याकरता देखील पालिका प्रशासनाकडून सल्लागार नेमण्यात येणार आहे. यापूर्वी, देखील महासभेपुढे सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव पालिकेने सादर केला होता. त्यावेळी ही योजना राबवण्यास नकार देत सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता. सल्लागारामार्फत, योजना कुठे राबवता येईल याचा अहवाल तयार करणे, नकाशा तयार करणे, योजना राबविण्याच्या दृष्टीने जागा निश्चित करणे, सर्वेक्षण करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत .