बगीच्यासाठी राखीव जागेत बार? मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत गदारोळ

मलनिःसारण केंद्राबाबतच्या ठरावावर आमदार तथा नगरसेविका गीता जैन बोलत असताना भाजपच्या नगरसेविका हेतल परमार यांनी जैन यांच्याकडे पाहून ‘खाली बस’ म्हणत इशारे सुरू केले. परमार अपशब्द वापरत बाटली घेऊन जैन यांच्या अंगावर धावून गेल्या.

मिरारोड येथील विकास आराखड्यात बगीच्यासाठी राखीव जागेचे आरक्षण बदलण्यावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान भाजपच्याच नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाल्याचे चित्र मिरा-भाईंदर महापालिकेच्या मंगळवारच्या महासभेत दिसले. यावेळी भाजप नगरसेविकेने आमदारावर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकारही घडला. अपशब्दांचा वापर करत भाजपची नगरसेविका सभागृहात बाटली घेऊन आमदार गीता जैन यांच्या अंगावर धावून गेल्या. राखीव जागेत बारच्या परवानगीसाठी आरक्षण बदल्याच्या विषयावर भाजपच्या नगरसेविका निला सोन्स आणि भाजपचेच नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्यात ही वादावादी झाली.

मलनिःसारण केंद्राबाबतच्या ठरावावर आमदार तथा नगरसेविका गीता जैन बोलत असताना भाजपच्या नगरसेविका हेतल परमार यांनी जैन यांच्याकडे पाहून ‘खाली बस’ म्हणत इशारे सुरू केले. परमार अपशब्द वापरत बाटली घेऊन जैन यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यामुळे दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला होता. हा वाद मिटवण्यासाठी महिला सुरक्षा रक्षकांना मध्यस्थी करावी लागली.

मिरारोड येथील आरक्षण क्र. ३०५ मध्ये विकास आराखड्यात बगीच्यासाठी राखीव असलेल्या जागेत बार बनवण्यासाठी सत्ताधारी भाजपने आरक्षण बदलण्यासाठी महासभेत ठराव मंजूर केला होता. त्यावर ‘ज’ अन्वये प्रस्ताव दाखल करत चर्चा करण्यासाठी सोन्स उठल्या असता त्यावरून महासभेत रणकंदन सुरू झाले. महापौरांच्या परवानगीने चर्चा होत असताना नगरसेवक अरविंद शेट्टी यांनी मधेमधे बोलत वाद घालण्यास सुरुवात केली. सोन्स यांनी शेट्टी यांच्यावर थेट ब्लॅकमेलर, असा आरोप केला. त्यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली. महापौरांनी सोन्स यांना बोलू न देता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत येणार्‍या महासभेत प्रशासनाच्या विधी विभाग व आयुक्तांनी काय कारवाई केली, याची माहिती सभागृहात द्यावी, असे निर्देश देत या विषयावरील चर्चा थांबवली.