मंगळवार,बुधवार पालघरमध्ये कूल डे

तापमानात ३ ते ४ अंश सेल्सियस घट होणार असल्याने थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वसईः गेल्या काही दिवसांपासून पालघऱ जिल्ह्यात थंडीने हुडहुडी भरली असतानाच आता मंगळवार आणि बुधवारीही तापमानात ३ ते ४ अंश सेल्सियस घट होणार असल्याने थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जिल्हयात १४ जानेवारीपासून तापमानात घट होऊ लागली असून मंगळवार आणि बुधवारी त्यात आणखी मोठी घट होणार आहे. सध्या जिल्ह्यात सरासरी तापमान ११.५ ते १६.७ अंश सेल्सियस होते. पुढील दोन दिवस त्यात किमान ३ ते ४ अंश सेल्सियसने घट होणार असल्याने थंडीत वाढ होण्याची शक्यता कोसबाड येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून सांगण्यात आले. सध्या सोमवारी जव्हारमध्ये सर्वात कमी ११.५ अंश सेल्सियस तापमान असून मंगळवारी आणि बुधवारी त्यात फारशी वाढ होणार नाही. तलासरी आणि वसई तालुक्यात साधारण १५.४ ते १६.५ अंश सेल्सियस तापमान असणार आहे.डहाणू, मोखाडा, पालघर, विक्रमगड आणि वाडा तालुक्यातही थंडीचा जोर वाढणार आहे.