घरपालघरपालिकेकडून नव्या नळजोडण्या देण्यास सुरुवात

पालिकेकडून नव्या नळजोडण्या देण्यास सुरुवात

Subscribe

त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने शहरांतर्गत पाणी पुरवठा योजनेतील नव्याने अंथरलेल्या जलवाहिन्यांची जलदाब चाचणी तसेच जलकुंभांची जलदाब चाचणी घेतलेली होती.

वसईः सूर्या पाणी पुरवठा योजनेतून अतिरिक्त पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर वसई- विरार महापालिकेने नव्या नळजोडण्या देण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. रहिवाशी गृहसंकुले, चाळी व सोसायटी-आस्थापना यांना ज्यांनी पैसे भरले आहेत तसेच महापालिकेचे करभरणा केला आहे अशा प्रतिक्षायादीतील रहिवाशांना प्राधान्याने नळजोडणी देण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. अनधिकृत नळजोडण्या दिल्या जाऊ नयेत, त्यातील गैरव्यवहार टाळता यावा, यासाठी दिल्या जाणार्‍या नळजोडणींचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या पाणी पुरवठा योजनेतून वसई -विरार महापालिकेला चाचणी स्वरूपात पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने शहरांतर्गत पाणी पुरवठा योजनेतील नव्याने अंथरलेल्या जलवाहिन्यांची जलदाब चाचणी तसेच जलकुंभांची जलदाब चाचणी घेतलेली होती. सद्यस्थितीत नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही पाणीपुरवठा विभागामार्फत पूर्ण झाली आहे.

शिवाय काही नवीन वाढीव भागांत टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. सद्यस्थितीत अस्तित्वातील नळजोडण्यांद्वारे नागरिकांना सुरळीत व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेने प्रलंबित नळजोडण्यांना तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी भाजपचे वसई विधानसभा संघटक मनोज पाटील यांनी केली होती. त्यांच्या या मागणीवर महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नवीन नळजोडणी देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जात असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात १४२ दशलक्ष लिटर पाण्याची तूट होती. त्यामुळे मार्च २०२१ पासून नव्याने नळजोडण्या देण्याचे काम बंद करण्यात आले होते. आता एमएमआरडीएच्या सूर्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळण्यास सुरुवात झाल्याने महापालिकेने नव्या नळजोडण्या देण्याचे काम सुरु केले आहे. प्रतिक्षा यादीनुसार प्राधान्याने नळजोडण्या दिल्या जाणार आहेत.

- Advertisement -

लोकसंख्या वाढली,पाण्याची मागणी वाढली

वसई-विरार उपप्रदेशातील चार नगरपरिषदा व ५५ गावांचा समावेश करून ३ जुलै २००९ रोजी वसई-विरार महापालिकेची स्थापना झाली होती. त्यावेळी महापालिका क्षेत्राची लोकसंख्या ११ लाख २३ हजार इतकी होती. २०११ नंतर नागरिकरणाचा वेग व लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली आहे. सद्यस्थितीत महापालिकेची लोकसंख्या अंदाजे २४ लाख इतकी झाली आहे. या लोकसंख्येस आवश्यक असणार्‍या पाण्याची मागणी ३७२ दशलक्ष लिटर इतकी आहे. महापालिकेस सर्व स्रोतांतून मिळून २३० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत होते. ११ सप्टेंबर २०२३ रोजीपूर्वी महापालिकेला १४२ दशलक्ष लिटर पाण्याची तूट भासत होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या योजनेतून महापालिकेस १८५ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. त्यामुळे वसई-विरारकरांची तहान भागणार आहे. महापालिका क्षेत्रात सध्या रहिवाशी, वाणिज्य व अन्य अशा एकूण ५९ हजार ६९३ इतक्या नळजोडण्या आहेत. आमच्या आजच्या मागणीनंतर प्रलंबित १२ हजार १९९ नळजोडण्याही लवकरच दिल्या जातील, अशी माहिती आयुक्त पवार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -