लग्नाला विरोध झाल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या

डहाणू तालुक्यातील तरुण 12 वीमध्ये तर मुलगी अकरावीत शिकत होती

suside

डहाणू तालुक्यातील एक युवा युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर एका युवतीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. डहाणू तालुक्यातील वंकास येथील तरुण 12 वीमध्ये तर मुलगी अकरावीत शिकत होती. दोघांचे वय साधारण 17 ते 18 च्या आसपास असावे. दोघांनी गांगनगाव जवळील बारडाच्या डोंगरावर जाऊन एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दोघांचे एकमेकांवर प्रेम होते आणि लग्न करायची तयारी होती. परंतु घरच्यांचा विरोध असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील मुलीचा हाताला आधी इजा झाली होती, त्यामुळे मुलीच्या हाताला काही प्रमाणात अपंगत्व होते. त्यामुळेच मुलाच्या घरच्या मंडळींचा लग्नासाठी नकार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच प्रेमी युगलाने बारडाच्या डोंगरमाथ्यावर जाऊन आत्महत्या केली आहे. दोघांचेही मृतदेह विच्छेदनासाठी डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दुसरीकडे एका तरुणीने आशागड येथील संतोषी माता मंदिर परिसरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या मुलीचे एका मुलासोबत चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. मुलाच्या आईने लग्नासाठी मुलीला दोन वर्षे थांबण्याचा सल्ला दिला असता मुलीने तो मान्य करून दोन वर्षे वाट पाहिली. परंतु त्यानंतर देखील मुलाकडून काहीच उत्तर आले नाही. तसेच मुलाने मुलीची टाळाटाळ सुरू केल्याने या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने मुलगी बचावली असून डहाणू कॉटेज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.