भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरात विविध ठिकाणी महापालिकेकडून नाले बनवले जातात. या नाल्यांवर बसवण्यात आलेली झाकणे कालांतराने खराब होतात किंवा वाहने जाऊन तुटतात. त्यामुळे तुटलेल्या झाकणाच्या ठिकाणी अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी गटारावरील तुटलेल्या झाकणाच्या ठिकाणी नवीन फायबरची झाकणे बसवण्यास महापालिकेकडून प्रशासकीय ठराव करून ४ कोटी २३ लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. नाले बनवल्यानंतर नाले साफसफाई करण्यासाठी गटारावर झाकणे बसवली जातात. झाकणे बसवताना अनेक वेळा ठेकेदार हा निकृष्ट दर्जाची झाकणे बसवल्याचे आढळून येते. त्यामुळे ती झाकणे लवकर तुटतात. तर काही वेळा चांगली झाकणे असली तरी त्या झाकणावरून वाहने जात असल्यामुळे ती झाकणे तुटतात. तुटलेल्या झाकणाच्या ठिकाणी रात्री अंधारात व पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्यास तुटलेली झाकणे दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होऊ शकतो. यापूर्वी गटारात पडून काही व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
महापालिकेने गटारावरील झाकणे लवकर तुटू नयेत यासाठी लोखंडी झाकणे बसवण्यास सुरुवात केली. परंतु ती चोरी जाण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. ही झाकणे महाग असल्यामुळे त्यामध्ये महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी आता शहरातील नाल्यावर ’फायबर’पासून तयार करण्यात आलेली झाकणे बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही झाकणे लोखंडी झाकणापेक्षा कमी किंमतीची व टिकाऊ असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे. नाल्यावर झाकणे बसवल्यामुळे पावसाळ्यात किंवा अन्य वेळी गटारात पडून दुर्घटना घडण्याची शक्यता कमी होते.
शहरातील गटारावरील धोकादायक व तुटलेल्या झाकणांची पाहणी करून किंवा झाकण तुटल्याची तक्रार आल्यास त्या ठिकाणी महापालिकेकडून नवीन झाकणे बसवण्यात येतात. गटारावरील लोखंडी झाकणे वारंवार चोरी होत आहेत. कुठेही अपघात किंवा दुर्घटना घडू नये यासाठी झाकणे बसवणे आवश्यक आहे. त्यामुळे ही फायबरची झाकणे बसवण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार या ठरावास मान्यता देण्यात आली आहे.
-दिपक खांबित – शहर अभियंता – मीरा -भाईंदर महापालिका