कोविड कोच पालघर रेल्वे स्थानकातून रवाना; २२ दिवसात अवघे ४ रुग्ण

रेल्वे प्रशासनांनी पालघर साठी २३ कोच असलेले ऑक्सिजन युनिटसह रेल कोच कोविड सेंटर उपलब्ध करून दिले होते. २२ मेच्या संध्याकाळी ही गाडी वलसाड येथील यार्डात पाठवण्यात आली.

महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्हासह पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रकोप वाढल्याने जिल्ह्यातील रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी जागा कमी पडत असल्याने राजकीय नेते व डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था यांनी रेल्वे प्रशासनाला रेल कोच कोविड सेंटरची मागणी केली होती. या मागणीला मान्य करत रेल्वे प्रशासनांनी पालघर साठी २३ कोच असलेले ऑक्सिजन युनिटसह रेल कोच कोविड सेंटर उपलब्ध करून दिले होते. २२ मेच्या संध्याकाळी ही गाडी वलसाड येथील यार्डात पाठवण्यात आली.

रेल कोच कोविड सेंटरचा पालघरमध्ये विशेष उपयोग न झाल्याने या गाडीची सेवा आवश्यक नसल्याचे जिल्हा प्रशासनाने रेल्वेला कळवल्यानंतर या गाडीची रवानगी वलसाड रेल्वे यार्डात करण्यात आली. विशेष म्हणजे २२ दिवसांच्या पालघर वास्तव्या दरम्यान अवघ्या चार कोविड रुग्णांनी त्याचा लाभ घेतल्याने या गाडीच्या व्यवस्थापनावर झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. नेते राजकीय पुढारी, जिल्हा प्रशासन तसेच डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थानी प्राणवायूची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना दाखल करण्यासाठी जिल्ह्यात सुविधा नसल्याने या गाडीची मागणी रेल्वेकडे केली होती. प्रत्यक्षात गाडी दाखल झाल्यानंतर हे डबे रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची सुविधा कोरोना काळजी केंद्राप्रमाणेच उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय ही गाडी फलाट क्रमांक तीनवर उभी करण्याचा निर्णय कोरोना रुग्णांसाठी तसेच रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाला त्रासदायक ठरत असल्याचे दिसून आले. बावीस दिवसात २३ डब्यांच्या गाडीमध्ये फक्त चार रुग्ण दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

जिल्ह्यात व विशेषतः पालघर तालुक्यात असणाऱ्या वेगवेगळ्या कोरोना काळजी केंद्रांमधील ५० टक्के खाटा रिकामी असल्याने अशा विलगीकरण डब्यांमध्ये असणाऱ्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर रुग्ण दाखल होण्यास तयार नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर या गाडीची सेवा व त्या अनुषंगाने केलेला करारनामा समाप्त करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. शनिवार २२ मेच्या सायंकाळी ही विशेष गाडी गुजरात राज्यातील वलसाड रेल्वे स्थानकाकडे रवाना झाल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

या संदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता रेल्वे प्रशासनाकडे ३८६ विलगीकरण डब्बे तयार असून विविध राज्यांकडून येणाऱ्या मागणीच्या अनुषंगाने त्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले. पालघर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने या कक्षाची गरज नसल्याचे कळवल्याने पालघर येथे असलेले २३ विलगीकरण डब्बे वलसाड यार्डमध्ये स्थलांतरित करून ठेवण्यात आले आहे. आगामी काळात आवश्यकता भासल्यास अशा डब्यांना जिल्हा प्रशासनाने मागणी केल्यास संबंधित ठिकाणी आणता येऊ शकतील. पालघर येथे या विलगीकरण डब्यांना विशेष प्रतिसाद मिळाला नसला तरी नंदुरबार येथे १३० पेक्षा अधिक रुग्णांनी रेल्वेच्या या विशेष सेवेचा लाभ घेतला असून रेल्वे विलगीकरण कक्षातील रुग्णांचा अनुभव सुखद असल्याचे सुमित ठाकूर यांनी दै. ‘आपलं महानगर’ला सांगितले.

हेही वाचा –

आबांनी आडवी केलेली बाटली, सरकारने शेवटी रिचवलीच – चित्रा वाघ