घरपालघरकांदळवनाची कत्तल करणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा

कांदळवनाची कत्तल करणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा

Subscribe

चौकशीत नायगाव पूर्वेच्या ससूनवघर, जूचंद्र, बापाणे येथील शासकीय, खाजण जमिनींवर कांदळवने नष्ट करण्यात आल्याचे उजेडात आले आहे.

वसई । वसई पूर्वेकडील जुचंद्र, ससूनवघर, बापाणे परिसरात कांदळवनाची कत्तल करून पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी चार जणांविरोधात महसूल विभागाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तहसिलदारांनी कारवाईचा बडगा उगारल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहे. वसई तालुक्याच्या किनारपट्टी व खाडीच्या भागात मोठ्या प्रमाणात कांदळवने आहेत. त्याठिकाणी माती भराव करून केले जाणारे अतिक्रमण व कत्तल यामुळे कांदळवने नष्ट होऊ लागली आहेत. कांदळवने कत्तल करणारे व त्यावर माती भराव टाकून अतिक्रमण करणार्‍यावर कारवाई करण्याची मागणी केली गेल होती. याप्रकरणी वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मंडळ अधिकार्‍यांना दिले होते. चौकशीत नायगाव पूर्वेच्या ससूनवघर, जूचंद्र, बापाणे येथील शासकीय, खाजण जमिनींवर कांदळवने नष्ट करण्यात आल्याचे उजेडात आले आहे.

ससूनवघर येथील सरकारी खाजण जमिनीवर कांदळवन होते. त्याठिकाणी मातीचा भराव टाकून झाडे तोडल्याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात धनेश्वर प्रभाकर भोईर (रा. ससूपाडा, ससूनवघर, वसई पूर्व) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍या एका प्रकरणात महसूल विभागाने केलेल्या पाहणीत जूचंद्र येथे मेघा प्रताप म्हात्रे व इतर ३३ यांनी भूमापन क्रमांक २६३/ब/१ क्षेत्र २.५९.२० हेक्टर, भूमापन क्रमांक २६४ क्षेत्र०.०४.४५ हेक्टर या खासगी जागेवर डेब्रिजची भरणी करून कांदळवनाचे नुकसान केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे मंडळ अधिकारी सुनील राठोड यांच्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाण्यात मेघा म्हात्रे यांच्यासह ३३ जणांविरोधात पर्यावरणाचा र्‍हास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

वसई पूर्वेकडील बापाणे येथील खासगी जमिनीवर मातीचा भराव करून तिवरांची झाडे नष्ट झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. मातीचा भरावही बेकायदेशीर करण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यामुळे नायगाव पोलीस ठाण्यात किशनलाल त्रिवेदी आणि मंगेश चव्हाण यांच्याविरोधात पर्यावरणाचा र्‍हास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायगाव रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील सरकारी खाजण जमिनीवर अतिक्रमण करून मातीचा भराव करून पार्किंग तयार करण्यात आली आहेत. याठिकाणी दररोज वाहने उभी करून त्याबदल्यात खासगी इसम पैसे वसूल करत नागरिकांची लुटमार सुरु असल्याच्या तक्रारी होत्या. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात शेखर वासुदेव पाटील, लिलन भालचंद्र भोईर, प्रथमेश म्हात्रे आणि तृप्ती मनोज म्हात्रे यांच्याविरोधात विनापरवानगी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून मातीचा भराव करून कांदळवनाची र्‍हास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांदळवनांची कत्तल करणार्‍यांविरोधात महसूल विभागाने गुन्हे दाखल करण्याची मोहिम हाती घेतली आहे. आतापर्यंत चार गुन्हे दाखल करण्यात आले असून ही कारवाई पुढे सुरुच ठेवली जाणार आहे, अशी माहिती तहसिलदार अविनाश कोष्टी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -