घरपालघरपर्यटनबंदीमुळे आदिवासींच्या रोजगारावर संकट

पर्यटनबंदीमुळे आदिवासींच्या रोजगारावर संकट

Subscribe

पर्यटनाला प्रशासनाकडून लगाम लावल्याने त्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक विक्रेते आदिवासींना मोठा फटका बसला आहे.

पालघर जिल्ह्यासह जव्हार-मोखाडा तालुक्यात ताळेबंदी शिथिल करण्यात आली. तसे पर्यटकांचा ओघ नदी, नाले डोंगर दऱ्यात फिरण्यासाठी येऊ लागले. मात्र, पर्यटनाला प्रशासनाकडून लगाम लावल्याने त्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक विक्रेते आदिवासींना मोठा फटका बसला आहे. टाळेबंदीमुळे आधीच तोट्यात गेलेल्या व्यवसाय आता कुठे रूळावर येत असतानाच जिल्ह्यातल्या पावसाळी पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्यानंतर पर्यटन स्थळांच्या आसपास व्यवसाय करणाऱ्या आदिवासी महिला, पुरूष, खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या रोजगारावर पुन्हा संकट कोसळले आहे. बंदीमुळे पर्यटक आले नाही तर रानमेवा, रानभाज्या विकायच्या कुठे असा प्रश्न आदिवासींना पडला आहे. छोटेखानी छपरात खाद्य पदार्थांच्या किरकोळ विक्रीतून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांनाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे त्यांच्यातही अस्वस्थता पसरली आहे.

निसर्गसंपन्न अशा जव्हार- मोखाडा तालुक्यात पावसाळ्यामध्ये पर्यटकांचा नेहमीच ओघ असतो. मोखाडा तालुक्यात सूर्यमाळ, देवबांध, अशोका धबधबा तर जव्हार तालुक्यात दाभोसा धबधबा, शिरपा माळ, जव्हारच्या ऐतिहासिक राजवाडा, हनुमान पॉईंट आदी पर्यटकांना आकर्षित करणारी स्थळे आहेत. यात धरणाचे पाणलोट क्षेत्र, नद्यांचे काठ, नैसर्गिक ओहोळ, धबधबे, गड किल्ले, माळरान अशा ठिकाणांचा समावेश आहे. निसर्गाच्या अगदी कुशीत असणारी ही स्थळे गाव, शहरांपासून बरीच दूर आहेत.

- Advertisement -

याठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांचा ओघ वाढल्यानंतर येथील स्थानिक फळ, भाज्या, मासे विक्रेते आपापली दुकाने सुरू करत असतात. पर्यटकांना याच स्थानिकांच्या मदतीने अस्सल घरगुती जेवण आणि इतर खाद्य पदार्थांची चव चाखता येते. यामुळे पर्यटकांनाही चांगल्या गोष्टी खाण्यास मिळतात. तर स्थानिकांनाही यातून चांगला रोजगार मिळतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जिल्हा प्रशासनाकडून बंदी घातली जात असल्याने येथील रोजगार धोक्यात आला आहे.

गेल्या वर्षभरापासून टाळेबंदीमुळे पावसाळा वगळता इतर काळात होणारी विक्रीही बंद असल्याने स्थानिकांना पावसाळी पर्यटनाकडून चांगली आशा होती. मात्र जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा संपूर्ण पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर बंदी घातल्याने स्थानिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. काही अंशी दुकाने सुरू ठेवली तरी बंदी आदेशानंतर पर्यटक येतील का असा प्रश्न आहे. त्यामुळे खिशातले पैसे घालून सुरू केलेला छोटेखानी व्यवसाय गुंडाळावा लागण्याची भीती स्थानिकांना वाटते आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे मार्च अखेरीस नव्याने टाळेबंदी घोषीत केल्याने एरवी रपेटीसाठी ग्रामीण भागाकडे येणाऱे प्रवासी घटले होते. एप्रिल महिन्यात कडक टाळेबंदीमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांना व्यवसाय बंद ठेवावे लागले होते. नुकतीच जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात तिसऱ्या स्तरातील नियमांमुळे दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा पर्यटनबंदीमुळे व्यवसाय ठप्प पडण्याची स्थानिकांना भीती आहे.

रानभाज्या, मासे आणि रानमेव्याचे करायचे काय?

जव्हार, मोखाडा तालुक्यातील विविध ठिकाणी आदिवासी महिला, कुटुंब जांभूळ, करवंद, रानभाज्या, पहिल्या पावसात येणारे गावराण मासे विक्रीसाठी बसत असतात. रस्त्यांवरून प्रवास करणारे पर्यटक त्यांचे प्रमुख ग्राहक असतात. मात्र बंदीमुळे या विक्रीयोग्य वस्तूंचे करायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. दाभोसा, जव्हार, सूर्यमाळ, देवबांध, अशोका धबधबा परिसर पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्र बिदू असतो. कोरोना प्रादुर्भावामूळे पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी गजबणारी निसर्गरम्य स्थळे पर्यटकांविना सुनी पडली आहेत. जव्हारचा प्रसिद्ध दाभोसा धबधबाही असाच पर्यटकांविना एकांतात कोसळत आहे.

(तुकाराम रोकडे – लेखक हे खोडाळा गावचे वार्ताहर आहेत)

 

हेही वाचा –

पावसामुळे अपघातात वाढ; हायवेवर दोन अपघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -