ग्राहक तक्रार पालघरची निवारण कार्यालय ठाण्यात

तरीही हे कार्यालय पालघर येथे त्वरित सुरू करावे व नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. दत्ता आदोडे यांनी पालकमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

पालघर : पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन नऊ वर्ष पूर्ण झाली तरीही आजतागायत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचे कार्यालय पालघर येथे सुरू करण्यात आलेले नाही. आजही या कार्यालयाचा कारभार ठाण्यावरून सुरू असल्याने पालघर जिल्ह्यातील नागरिकांना ठाणे येथे हेलपाटे मारावे लागत आहेत. या कार्यालयासाठी पालघर येथे जागा उपलब्ध आहे. तरीही हे कार्यालय पालघर येथे त्वरित सुरू करावे व नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. दत्ता आदोडे यांनी पालकमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

ग्राहक तक्रार निवारण आयोग ठाणे येथे असून सदर कार्यालयास पूर्णवेळ अध्यक्ष नाही. त्याचा पदभार हा नाशिक ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष यांच्याकडे आहे. सदर कार्यालयात पालघर जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारी गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. पालघर जिल्हा कार्यालयात प्रशासकीय भवन बी येथे कार्यालयाकरिता खोली नंबर 101 मध्ये ग्राहक तक्रार निवारण कार्यालयासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तरीही हे कार्यालय पालघर येथे सुरू करण्यास चालढकल करण्यात येत आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांना होणार्‍या त्रासापासून सुटका करावी अशी मागणीही आदोडे यांनी केली आहे.