डहाणू : कासा-सायवन राज्यमार्गावर वाघाडी येथे शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. एका भरधाव गाडीने दुचाकीला धडक दिल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. राहुल हरके (२०), चिन्मय चौरे (१९) आणि मुकेश वावरे (२०) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना कासा चारोटी परिसरातील आहे. जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची तीव्रता एवढी होती की दुचाकी आणि गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत कासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश मांदळे तपास करत असून, अपघाताचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कासा-सायवन राज्यमार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. प्रशासनाने वेगावर नियंत्रणासाठी आणि सुरक्षा उपायांसाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
Dahanu Accident: डहाणूत 3 तरुणांचा अपघातामध्ये मृत्यू
written By My Mahanagar Team
dahanu