HomeपालघरDahanu Accident: तीन आश्रम शाळांना अन्नपुरवठा करणार्‍या वाहनांचा अपघात

Dahanu Accident: तीन आश्रम शाळांना अन्नपुरवठा करणार्‍या वाहनांचा अपघात

Subscribe

या वाहनात तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळच्या जेवणाचे डबे वाहून नेले जातात . मात्र, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे अन्न पुरवठा भरलेले डबे रस्त्यावर विखुरले.

डहाणू : डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चळणी, सायवन, दाभाडी किन्हवली या आश्रमशाळांना अन्नपुरवठा करणार्‍या वाहनाचा कासा पोलीस ठाणे हद्दीत बापूगाव जवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका भरधाव वेगाने येणार्‍या वाहनाने अन्नपुरवठा करणार्‍या गाडीला एका बाजूने दाबल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाल्याची माहिती चालक व स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

या वाहनात तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळच्या जेवणाचे डबे वाहून नेले जातात . मात्र, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे अन्न पुरवठा भरलेले डबे रस्त्यावर विखुरले. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर अन्न मिळण्यास विलंब झाला. या घटनेनंतर तत्काळ पर्यायी गाडी पाठवून अन्नपुरवठा करण्यात आल्याची माहिती डहाणू प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांनी दिली आहे.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. पालकांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना गरमागरम अन्न शाळांमध्येच तयार करून दिले जात होते. मात्र, सध्या एका खासगी कंपनीमार्फत अन्न तयार करून 40-50 किलोमीटर दूरवरून शाळांमध्ये पोहोचवले जात असल्याने ते थंड आणि शिळे होत असल्याचा आरोप केला जात आहे.या भागातील रस्त्यांवर सर्रासपणे अवजड अवैध वाहतूक होत असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. अशा घटनांमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणाचा तपास कासा पोलीस ठाणे करत असून, पुढील कारवाई सुरू असल्याचे समजते.

 

“विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांमध्येच स्वयंपाकाची पूर्वीप्रमाणे सोय करावी, जेणेकरून यासारखे अपघात आणि पावसाळ्यात पूर आपत्ती निर्माण होणार्‍या अडचणींमुळे विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागते,तशी परिस्थिती उद्भवणार नाही.

– संजय पवार , पालक


Edited By Roshan Chinchwalkar