Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरDahanu Farming : खरीप हंगामात गवार लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल

Dahanu Farming : खरीप हंगामात गवार लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल

Subscribe

मात्र, आता सरकारच्या कृषी योजनांपेक्षा अनेक सामाजिक संस्थांनी शेतकर्‍यांना शेतीकडे वळवून स्थानिक पातळीवर स्थायिक होण्यास मदत केली आहे.

डहाणू : यंदाच्या वर्षी खरीप हंगामात गवार लागवडीसाठी शेतकर्‍यांचा कल वाढला असून, आदिवासी ग्रामीण भागात खरीप हंगाम शेती करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मिरची, गवार, झेंडू, तूर, चवळी, भेंडी, मोगरा या प्रकारच्या फळ-पाले भाज्या, तसेच फुलशेतीची आवड ग्रामीण भागातील शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर्षी डहाणू तालुक्यातील आदिवासी भागात गवाराच्या पिकाची लागवड सर्वाधिक करण्यात आली आहे.

सामाजिक संस्थांच्या सक्रिय सहभागामुळे शेतकर्‍यांना कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे प्रगतशील शेतीचे मार्गदर्शन मिळाले आहे. या संस्थेने शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली असून, यामध्ये शेतकर्‍यांना मोफत बी बियाणे वाटप करून शेती करण्यास प्रोत्साहन दिले आहे. संस्थेच्या सहकार्याने शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक मनोबल वाढले आहे आणि त्यांना शेतकर्‍यांच्या थेट बांधावर पोहोचून मार्गदर्शन दिले आहे. पूर्वी आदिवासी ग्रामीण भागात शेतकरी पारंपरिक पद्धतीने भात शेती करत होते. परंतु पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून उन्हाळ्यात स्थलांतर करून शहरात मोलमजुरी करत होते. यामुळे शेतकर्‍यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते आणि कुटुंबाचा जीवनमान खालावला होता. मात्र, आता सरकारच्या कृषी योजनांपेक्षा अनेक सामाजिक संस्थांनी शेतकर्‍यांना शेतीकडे वळवून स्थानिक पातळीवर स्थायिक होण्यास मदत केली आहे.

- Advertisement -

कोसबाड कृषि विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने आणि सर नेस वाडिया यांच्या सहकार्याने डहाणू तालुक्यातील आशागड, कासा, सायवन भागातील १,४१२ शेतकर्‍यांना आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये भाजीपाला रोपे तयार करणे, बीज प्रक्रिया, वाफे तयार करणे, प्लास्टिक आच्छादन, रोपांची पुनर्लागवड, पीक संरक्षण इत्यादी विषयांचा समावेश होता. कृषी विज्ञान केंद्रातर्फे ३३ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ज्यात १३ कार्यक्रम केंद्राच्या प्रक्षेत्रावर आणि २० कार्यक्रम शेतकर्‍यांच्या शेतांवर घेण्यात आले. यामध्ये १,४१२ शेतकर्‍यांचा सहभाग होता. ज्यात १,०१६ पुरुष आणि ३९६ महिला शेतकर्‍यांचा समावेश आहे.शेतकर्‍यांचे पिकांचे उत्पादन वाढत असून, गवाराच्या पिकासाठी शेतकर्‍यांचा वाढता कल निश्चितच आनंददायक आहे. यामुळे ग्रामीण भागातील स्थलांतर थांबले असून, अनेक कुटुंबे शेती करून आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधत आहेत. या सकारात्मक बदलामुळे ग्रामीण भागाच्या विकासात नवा सूर लवला आहे, आणि अनेक शेतकरी अब्जावधी रुपयांच्या उत्पन्नाचा मार्ग साधू शकतात,अशी चर्चा आहे.


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -