डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी 11 वाजता डहाणूतील चारोटी टोल नाक्याजवळ एका ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणार्या या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या घटनेत ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनंतर काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले. महत्वाचे म्हणजे, या महिन्यात महामार्गावरील ही चौथी आग लागण्याची घटना आहे. वारंवार घडणार्या अशा घटनांमुळे वाहनचालक आणि मालकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाकडे अद्याप स्वतःची अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी टोल प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
Dahanu Fire: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण आग: ट्रक जळून खाक
written By My Mahanagar Team
dahanu