डहाणू : कासा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विविध भागांमध्ये घनकचर्याच्या व्यवस्थापनाचा अभाव दिसून आला असून यामुळे ग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावरील टाकलेल्या कचर्यामुळे मोकाट जनावरांची संख्या रस्त्यावर फिरणे वाढल्याने अपघाताचा मोठा धोका संभावना वाढली आहे. त्याच बरोबर नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
ग्रामपंचायत हद्दीत घनकचर्याचा प्रश्न गंभीर वाढला असून येथील कासा बाजारपेठ, भिसेनगर, पाटील पाडा, डोंगरी पाडा, बरड पाडा, वळवी पाडा आणि गायकवाड पाडा अशा भागांमध्ये कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही. ग्रामपंचायतीने नियुक्त केलेल्या घंटागाड्या वेळेवर सेवा देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवर कचर्याचा थर पडला असून काही ठिकाणी शिवमंदिर परिसर, नर्सरी आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने ये-जा करणार्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. प्लास्टिक, भाजीपाला, व अन्य कचरा उघड्यावर फेकल्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
उघड्यावर टाकलेल्या कचर्याने मोकाट जनावरांवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. मोकाट जनावरे उघड्यावर टाकलेला कचरा आणि प्लास्टिक खात असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. ग्रामपंचायत वसाहतीत सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या लोकांचे आरोग्य या घनकचर्यामुळे संकटात आले आहे. सुमारे १०,००० लोकसंख्या असलेल्या कासा गावात घनकचर्याच्या व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना कचरा उघड्यावर टाकावा लागत असल्याने स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत. स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीने तातडीने घंटागाड्यांची नियमित सेवा उपलब्ध करून द्यावी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने कचर्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी केली आहे.ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना न केल्यास आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या अधिक तीव्र होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
“घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन घंटागाड्या नेमल्या आहेत. मात्र, रात्री नागरिक कचरा थेट रस्त्यावर फेकतात, त्यामुळे समस्या अधिक बिकट होते. नागरिकांच्या सोयीसाठी घंटागाड्यांच्या फेर्या वाढवण्याचा विचार सुरू आहे.”
– हरेश मुकणे , उप सरपंच, कासा ग्रामपंचायत