घरपालघरदहिसर-भाईंदर लिंकची मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंकडून घोषणा

दहिसर-भाईंदर लिंकची मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंकडून घोषणा

Subscribe

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर झाले असून मुंबई महापालिका सुमारे १५०० कोटी रुपये खर्च करून लिंक रस्ता विकसित करणार आहे.

मुंबई-दहिसर ते मिरा-भाईंदर लिंक रस्त्याची घोषणा गुरुवारी मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर झाले असून मुंबई महापालिका सुमारे १५०० कोटी रुपये खर्च करून हा रस्ता विकसित करणार आहे. लाखो मिरा-भाईंदरकरांना मुंबईशी जोडण्यासाठी आणखी एक महत्वपूर्ण रस्त्याचा पर्याय यामुळे उपलब्ध होणार असून ठाकरे सरकारने मिरा-भाईंदरला नवीन वर्षाची ही भेट दिली आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. दहिसर ते मिरा-भाईंदर या लिंक रोडच्या विस्ताराची मागणी आमदार सरनाईक गेले काही वर्षे करत होते. राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दहिसर ते मिरा-भाईंदर लिंक रस्ता तयार करण्याबाबत आमदार सरनाईक यांनी पाठपुरावा सुरु केला होता.

आमदार सरनाईक यांच्या मागणीची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली व त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी नुकतीच १६ डिसेंबर रोजी या लिंक रस्त्याच्या कामाबाबत मुंबई महापालिकेत बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीतच हा रस्ता मंजूर झाला होता. पण या रस्त्याचा विकास कोणते प्राधिकरण करणार, रस्त्यासाठी येणारा खर्च कोण करणार याबाबतचा निर्णय होणे बाकी होते. मुंबई महापालिकेनेच हा रस्ता विकसित करावा, अशी विनंती आमदार सरनाईक यांनी आदित्य ठाकरे यांना केली होती. अखेरीस आमदार सरनाईक यांच्या मागणीला यश येऊन हा रस्ता मुंबई महापालिका विकसित करेल, असे स्वतः मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

मुंबई शहर व उपनगरांच्या विकासकामांमध्ये मुंबई-मिरा-भाईंदर येथील कनेक्टिव्हिटी वाढवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुंबई महापालिका दहिसर लिंक रोडपासून भाईंदरपर्यंत ६ किमी लांब आणि ४५ मीटर रुंद रस्ता बांधणार आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत १.५ किमी व ४.५ किमी रस्ता मिरा-भाईंदर महापालिकेकडे असेल. या ६ किमी रस्त्याचे काम मुंबई महापालिका युद्धपातळीवर पूर्ण करेल. या मार्गामुळे दहिसर पश्चिम ते भाईंदर दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होईल. तसेच दहिसर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. शिवाय हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाशीही जोडण्यात येईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

दहिसरच्या वाहतूक कोंडीतून होणार सुटका

दहिसर टोल नाक्यावर प्रचंड वाहतुककोंडी होते. त्यामुळे त्याचा प्रचंड त्रास मुंबईकरांप्रमाणेच मिरा-भाईंदरच्या नागरिकांनाही होतो. दहिसर-मिरा भाईंदर लिंक रस्ता झाल्यानंतर मिरा भाईंदरच्या नागरिकांना जाण्या-येण्यासाठी आणखी एक रस्ता मिळणार असून त्यामुळे लोकांच्या वेळेची, इंधनाची, पैशाची बचत होणार आहे. मिरा-भाईंदरच्या नागरिकांना थेट मुंबईला काही मिनिटात पोहोचता येणार आहे. दहिसर-मिरा भाईंदर लिंक रस्ता मुंबई महापालिका विकसित करणार आहे. त्याचा फायदा मिरा-भाईंदरच्या नागरिकांना अधिक होणार आहे. मिरा-भाईंदर महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेनेच त्यांचा निधी खर्च करून हा रस्ता विकसित करण्याची आमदार सरनाईक यांची मागणी ठाकरे सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर महापालिकेवर कोणताही आर्थिक ताण न येता शहराला हा रस्ता मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

ईश्वर चिठ्ठी म्हणजे काय ? शिवसेनेच्या बागलकरांप्रमाणे सतीश सावंतांनाही ईश्वर चिठ्ठीचा फटका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -