नवीन पाटील, सफाळे : मुंबई -बडोदा एक्सप्रेसवेच्या कामासाठी रात्रपाळी करुन सकाळी नवघर बंदराजवळ बोटीने येणार्या ४० कामगारांसह बोट खाडीपात्रात बुडल्याची घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर स्थानिक मच्छीमार बांधव, पोलीस यांनी तत्काळ धावपळ करीत कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. दिवसभरातील बचाव मोहिमेत ४० पैकी ३४ कामगारांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून यातील चार कामगारांना सफाळे येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. तर बुडलेल्या सहा कामगारांचा अद्यापही शोध सुरुच आहे. हे सर्व कामगार बंगाल, मध्यप्रदेश, बिहार येथील राहणारे असल्याची माहिती मिळत आहे.तर दुसरीकडे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीत, २० कामगार सापडले असून दोन कामगारांचा शोध सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. आदर्श शुक्ला आणि निर्मल मिश्रा अशी या दोन बेपत्ता कामगारांची नाव असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र वास्तवात बोटीतून ४० कामगार प्रवास करत असल्याची माहिती तेथील कर्मचार्याने दिली. तसेच सहा कामगार अद्यापही सापडले नसल्याने रात्रीच्या सुमारास अन्य कामगारांनी जोवर बेपत्ता झालेले कामगार सापडत नाहीत, तोवर कामबंद आंदोलन पुकारले आहे. तसेच त्यांच्यात अत्यंत गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालघर जिल्ह्यात मुंबई- बडोदा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. जीआर इन्फ्रा कंपनीकडे मार्ग बांधकामाचा ठेका असून द्रुतगती महामार्गासाठी वैतरणा नदीपात्रात पुलाचे बांधकाम सुरू आहे. द्रुतगती महामार्गाच्या पूल उभारणीचे काम करणार्या कामगारांना घेऊन नदीपात्रातून परतणारी बोट नदीपात्रात बुडल्याने ही मोठी दुर्घटना सकाळी घडली . नदीपात्रात पूल उभारण्याचे काम करणार्या कामगारांना नदीपात्रातून ने- आण करण्यासाठी स्टील प्रवासी बोट वापरण्यात येते. मात्र, ही स्टील प्रवासी बोट बिघडल्याने टंक बोट वापरून नदीपात्रात असलेल्या या कामगारांना नदीकिनारी आणण्यात येत होते. कामगारांना घेऊन ही बोट परतत असतानाच वैतरणा नदी पात्रात ही बोल उलटली आणि बुडाली. वैतरणा नदी पात्रात वाढीव- वैतीपाडा नजीक ही दुर्घटना घडली आहे. नदीपात्रातून कामगार घेऊन येत असलेल्या या टंक बोटीत एका बाजूने बसल्याने बोट एका बाजूला कलंडली आणि नदी पात्रात बुडाल्याची माहिती आहे. बोट नदीत बुडत असल्याचे निदर्शनात येताच बोटीतील काही कामगारांनी नदीपात्रात उड्या मारल्या तसेच काही कामगार पोहत नदी किनारी पोहोचले. घटनेची माहिती मिळताच पालघरचे प्रांताधिकारी, तहसीलदार रमेश शेडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंडळ अधिकारी, सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी आणि राष्ट्रीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
बॉक्स
नदीपात्रातून कामगारांची ने- आण करताना त्यांना सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट देण्यात आले नाही. कमी क्षमतेच्या बोटीतून अधिक कामगार बसविण्यात आले का? त्याचप्रमाणे बांधकाम करताना देखील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत की नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून या दुर्घटनेमुळे मुंबई- बडोदा द्रुतगती महामार्गाचे बांधकाम करणार्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.