दिवस चौथा, आंदोलक जुनी पेन्शनवर ठाम

14 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या विराट मोर्चा नंतर प्रत्येक तालुक्यातील कर्मचारी आपापल्या कार्यालयासमोर येऊन दिवसभर ठिय्या आंदोलन करत आहेत.

सफाळे/जव्हार :  जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 14 मार्च पासून सुरू झालेला शासकीय कर्मचार्‍यांचा बेमुदत संप आज चौथ्या दिवशीही सुरु होता. संपाची तीव्रता आणखी वाढली आहे.या बेमुदत संपला विविध संघटना, राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. 14 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या विराट मोर्चा नंतर प्रत्येक तालुक्यातील कर्मचारी आपापल्या कार्यालयासमोर येऊन दिवसभर ठिय्या आंदोलन करत आहेत.

पंचायत समिती पालघर येथे संपाच्या चौथ्या दिवशी पालघर पंचायत समिती सभापती शैला कोलेकर, उपसभापती मिलिंद वडे तसेच पंचायत समितीचे सदस्य तुषार पाटील, किरण पाटील, दिलीप पाटील तसेच संदेश ढोणे बांधकाम सभापती तथा जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी यांनी जमलेल्या हजारो कर्मचार्‍यांना संबोधित केले व आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. परंतु, या संपामुळे शासकीय योजनांकरिता लागणारे विविध दाखले आणि अर्ज भरण्यासाठी ग्रामीण तथा शहरी भागातील अनेक नागरिक दाखल होत आहेत. संप असल्यामुळे कार्यालयात केवळ साहेब तेवढे कामावर असून कर्मचारी संपावर गेल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.