घरपालघरमृत्यू नालासोपार्‍यात, मृतदेह वसईत

मृत्यू नालासोपार्‍यात, मृतदेह वसईत

Subscribe

मात्र काही दिवसांनी मिश्रा याचा मृत्यू गणेशोत्सव मंडपात नाही तर नालासोपारा पूर्वेच्या शादी डॉट कॉम या सभागृहात झाल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली.

वसई : नालासोपारा येथील शादी डॉट कॉम या सभागृहात शॉक लागून कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर हा गुन्हा दडपण्यासाठी मालकाने मृतदेह वसईतील गोखीवरे येथे नेऊन ठेवल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी सभागृहाच्या मालकासह त्याच्या पत्नीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर महावितरण आणि वसई विरार महापालिकेचा हलगर्जीपणाही उजेडात आला आहे. ६ सप्टेंबर रोजी सत्येंद्र मिश्रा (४२) या कर्मचार्‍याचा वसईतील गोखिवरे येथे गणेशोत्सव मंडपाचे काम करत असताना विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची माहिती मंडपाचे ठेकेदार प्रदीप सिंग याने दिली होती. त्यानुसार आचोळे पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह मृत इसमाच्या गावी अंत्यसंस्कारासाठी पाठवला होता. मात्र काही दिवसांनी मिश्रा याचा मृत्यू गणेशोत्सव मंडपात नाही तर नालासोपारा पूर्वेच्या शादी डॉट कॉम या सभागृहात झाल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली.

गोखिवरेमध्ये ज्याठिकाणी घटना घडली असा दावा ठेकेदाराने केला होता. तेथे असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. सभागृहाचे सीसीटीव्ही बंद होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता मिश्रा याचा मृतदेह सभागृहातून बाहेर नेत असताना दिसून आले. मालक प्रदीप सिंग याने हा प्रकार दडपल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याप्रकरणी तुळींज पोलिसांनी सभागृहाच्या मालक शोभना सिंग आणि प्रदीप सिंग यांच्या विरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरण्याप्रकरणी कलम ३०४(अ) तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम २०१,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही महावितरण व सार्वजनिक बांधकाम खात्याला पाचारण करून पंचनामा केला व त्या कर्मचार्‍याचा मृत्यू सभागृहातच झाल्याचे स्पष्ट झाले अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी दिली. दरम्यान,या सभागृहाला दिलेली वीज जोडणी ही अनधिकृत आणि असुरक्षित आहे. ती खंडीत न केल्यास भविष्यात जीवित होईल, असे लेखी पत्र आम्ही महावितरणाला देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु एक महिना उलटूनही महावितरण कार्यालयाने विद्दुत पुरवठा खंडित न केल्यामुळे ही दुर्घटना घडली, असे प्रहार पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी सांगितले. जर वेळीच कारवाई केली असती तर कर्मचार्‍याचा जीव वाचला असता असेही ते म्हणाले.

- Advertisement -

महावितरण वसई मंडळाने तुळींज येथील अनधिकृत शादी डॉट कॉम या हॉलला केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनिमय (विद्युत पुरवठा व सुरक्षा संबंधीची उपाययोजना) मधील विनिमय क्र. ३३, ३५ व ३६ चे उल्लंघन करून तसेच नियमबाह्य व धोकादायक पद्धतीने एका नारळाच्या झाडावर फळी मारून असुरक्षित व्यावसायिक थ्री फेस जोडणी दिली होती. ही जागा प्रकाश रामचंद्र नाईक व कुटुंबियांच्या मालकीची असून त्यांनी भाड्याने दिली होती. या जागेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे अतिक्रमण करून प्रदीप लल्लन सिंग याने अवैध कब्जा करून त्याचा बायकोच्या नावे व्यावसायिक थ्री फेस जोडणी जोडून घेतली होती. याची माहिती मिळताच नाईक यांनी तक्रार केली होती. त्यानंतर प्रदीप लल्लन सिंग यांच्याविरोधात बनावट कागदपत्रे बनवून कब्जा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसेच महावितरण कार्यालयाला वीज जोडणी खंडित करण्यासाठी पत्र दिले होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे चंदू पाटील यांनी सदर बेकायदा वीज जोडणीप्रकरणी महावितरणकडे तक्रार केली होती. त्यात महावितरणे कारवाई केली नाही तर भविष्यात जिवीतहानी होण्याची भिती व्यक्त केली होती. पण, तक्रार करून महिना उलटल्यावरही महावितरणने विद्युत पुरवठा खंडित न केल्यामुळे १४ सप्टेंबरला हॉलमध्ये काम करत असलेला कामगार सत्येंद्र कपिलदेव मिश्रा याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला.

महावितरण आणि महापालिकेने वेळीच कारवाई केली असती तर सत्येंद्र मिश्रा यांचा जीव वाचला असता. अनधिकृत बांधकामांना वीज जोडण्या देऊ नयेत असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. याही आदेशाचा भंग महावितरणने केला आहे. त्यामुळे न्यायालयीन आदेशाचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर करणे, हलगर्जीपणासह मिश्रा यांच्या मृत्यूस जबाबदार धरून महावितरणे अधिक्षक अभियंता संजय खंदारे, कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दखल करण्याची मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी केली आहे. कारवाई व्हावी आणि पिडीत कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी न्यायालयातही दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -