वसईः पंतप्रधानांच्या हस्ते एमएमआरडीएच्या सूर्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे सांगितले जात असल्याने सरकारनेच पाणी रोखल्याचा आरोप होऊन वसईत पाण्यावरून राजकारण सुरु आहे. त्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेत वसई- विरार महापालिका प्रशासनाने मौन पाळल्याने पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला तडा जात आहे. त्यासाठी महापालिकेने श्वेत पत्रिका काढून खरी परिस्थिती वसईकरांना सांगावी. अन्यथा प्रशासनाविरोधात राष्ट्रपती आणि पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली जाईल, असा इशारा भाजपचे प्रसिध्दी प्रमुख मनोज बारोट यांनी दिला आहे. वसई- विरार महापालिका क्षेत्रातील नागरिक गेल्या पस्तीस वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अगणित आंदोलने झाली. आंदोलकांना केवळ आश्वासने मिळाली आहेत, पाणी नाही, हे खरे आहे. मात्र गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलने ही पाणी प्रश्नासाठी नसून, नागरिकांची दिशाभूल करून श्रेय लाटण्याच्या उद्देशाने केलेली राजकीय भाकरी कमावण्याच्या उद्देशाने केली गेली आहेत, असा आरोप बारोट यांनी केला आहे.
मोदी सरकारच्या अमृत योजनेंतर्गत सुमारे १ हजार ३२५ कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या सूर्या प्रकल्पातून वसई- विरार महापालिकेला १८५ एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. त्यापैकी सुमारे ८५ एमएलडी पाणी नागरिकांना कधीही उपलब्ध होऊ शकते. काही राजकीय पक्षांनी पाण्याचे श्रेय लाटण्यासाठी गलिच्छ राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे. सूर्या प्रकल्पाचे ८५ एमएलडी पाणी येथील जनतेसाठी सोडायला जून महिन्यापासून तयार आहे. पण उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. त्यानंतर पंतप्रधान या प्रकल्पाचे उद्घाटन करणार असल्याची अफवा पसरवण्यात आली असा आरोप बारोट यांनी केला आहे.नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरार दौर्यावर आले असता त्यांनाही काळे झेंडे दाखवण्यात आले. पाण्यावरून होत असलेल्या गलिच्छ राजकारणाबाबत देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे बोटे दाखवली जात असतानाही, महापालिका प्रशासन मौन बाळगून आहे. महापालिका प्रशासनाच्या या मौनामुळे देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला तडा जात आहे, असाही बारोट यांचा आरोप आहे.
भाजपचा रोख नक्की कुणाकडे?
एमएमआरडीए आणि खासदार राजेंद्र गावीत यांच्याकडूनच पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होण्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली गेली होती. तसेच मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने लोकार्पण सोहळा लांबणीवर पडल्याचेही सांगितले जात होते. एमएमआरडीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. असे असताना भाजपचे प्रसिध्दी प्रमुख मनोज बारोट यांनी नक्की कुणाला इशारा दिला याची चर्चा वसईत सुरु आहे.