घरपालघरपालघर जिल्हा परिषदेत ठाकरे गटाचा सुपडासाफ

पालघर जिल्हा परिषदेत ठाकरे गटाचा सुपडासाफ

Subscribe

या निवणुकीत बहुजन विकास आघाडीने देखील शिंदे गट आणि भाजपला पाठिंबा दिला.

पालघर: पालघर जिल्हा परिषदेत अखेर अडीच वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. आज झालेली अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रकाश निकम तर उपाध्यक्षपदी भाजपचे पंकज कोरे यांची बिनविरोध निवड झाली.शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्तापालट केल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाकडे एकही सदस्य उरलेला नाही. अध्यक्षपदासाठी प्रकाश निकम आणि उपाध्यक्ष पदासाठी पंकज कोरे या फक्त दोनच उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी धनाजी तोरसकर यांच्याकडे आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.या निवणुकीत बहुजन विकास आघाडीने देखील शिंदे गट आणि भाजपला पाठिंबा दिला.

२०२० साली झालेल्या पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत आणि २०२१ सालच्या पोटनिवणुकीनंतर शिवसेना २० जागा, राष्ट्रवादी काँग्रेस १३ जागा,भाजप १३ जागा,माकप ६ जागा आणि बहुजन विकास आघाडी 5 जागा असे पक्षीय बलाबल आहे. नंतरचे सव्वा वर्षे वैदेही वाढाण यांनी अध्यक्षपद भुषवले होते.तर जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले ज्ञानेश्वर सांबरे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती.यादरम्यान जून महिन्यात राज्यात शिवसेनेमध्ये फाटाफूट झाली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट निर्माण होऊन त्याचा परिणाम पालघर जिल्ह्यातील शिवसेनेवर देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे.

- Advertisement -

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच पुन्हा ३ महिन्यांचा दिलेल्या वाढीव कार्यकाळाची मुदत संपताच आज १६ नोव्हेंबर रोजी नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती.या निवडणुकीच्या आधीच शिवसेना उध्दव बाळासाहेब गटाचे सर्वच्या सर्व २० सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटात सामील झाल्याने ठाकरे गटाची जिल्हा परिषदेतील संपूर्ण पाटी कोरी झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गट आणि भाजपकडे बहुमतासाठी २९ सदस्यांचे पुरेसे संख्याबळ असल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या १३ सदस्यांना निवडणुकीत अनुपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावल्याने शिंदे गट आणि भाजपचा जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

आज निवडणुकीसाठी भाजपच नेतेे आणि पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि शिंदे गटाचे संपर्कप्रमुख रविंद्र फाटक हे पालघरमध्ये तळ ठोकून होते. निवडणुकीच्या आधी शिंदे गटाने ठाकरे गटातील जवळपास ९ सदस्य फोडून सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर केला. गेले ७ दिवस पनवेल येथील रिसॉर्टवर ठेवलेल्या या सर्व सदस्यांना काल रात्री मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट आणि त्यानंतर आज दुपारी जिल्हा परिषद इमारतीत आणण्यात आले. निवडणुकीच्या वेळेस पालकमंत्री रविंद्र चव्हाण,खासदार राजेंद्र गावित, संपर्कप्रमुख रविंद्र फाटक,आमदार श्रीनिवास वणगा, बविआचे आमदार राजेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

ठाकरेंना पालघरमध्ये दुहेरी झटका
पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आदल्या रात्री पालघर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी संध्याकाळी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनीही प्रवेश केला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात येऊन शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आहे. मुख्यमंत्री तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून वसंत चव्हाण यांची बोईसर आणि विक्रमगड विधानसभा क्षेत्र आणि पालघर जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला पालघर जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले शिलेदार आता हळूहळू बाळासाहेबांची शिवसेना पक्षात येऊन दाखल होऊ लागल्याने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी वसंत चव्हाण यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने शिंदे यांचेही जिल्ह्यातील बळ अधिक वाढले आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी आमदार आणि पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, माजी नगरसेवक राम रेपाळे आणि पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रकाश निकम यांची राजकीय कारकीर्द
२००० साली जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम मोखाडा ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर २००२ साली मोखाडा पंचायत समिती सदस्यपदी त्यांची निवड होऊन २००५ साली त्यांनी सभापती म्हणून पद भूषवले. तर २०१० साली पुन्हा मोखाडा पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून येऊन २०१२ साली पुन्हा पंचायत समितीचे सभापती होण्याचा मान त्यांना मिळाला. २०१४ साली मोखाडा तालुक्यातील पोशेरा गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले. २०१९ साली पालघर तालुक्यातील तारापूर गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून दुसर्‍यांदा निवडून आले. १६ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या चेंबरमध्ये उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरेंचे अद्याप फोटो
जिल्हा परिषदेच्या मावळत्या अध्यक्षा वैदेही वाढाण शिंदे गटात नवरात्रीच्या दिवसातच गेल्या होत्या. त्यानंतरही त्यांच्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात असलेल्या चेंबरमध्ये उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या तसबिरी बुधवारी अध्यक्षांच्या निवडीनंतरही कायम होत्या. नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश निकम हे शिंदे यांचे जवळचे मानले जातात. शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर पालघर जिल्ह्यातून प्रकाश निकम यांनी सर्वात आधी त्यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. त्यामुळे अध्यक्षपदाचा पदभार स्विकारलेले प्रकाश निकम त्यांच्या चेंबरमध्ये असलेल्या उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या तसबिरी लगेचच काढतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -