घरपालघरआदर्श शिक्षक पुरस्काराला मुहूर्त मिळेना

आदर्श शिक्षक पुरस्काराला मुहूर्त मिळेना

Subscribe

मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे आचारसंहितेचे कारण देऊन तो आजतागायत प्रलंबित ठेवण्यात आला असल्याबद्दल हा पुरस्कार सोहळा करण्याबाबत कुठल्याही प्रकारची हालचाल शिक्षण विभागाकडून होत नसल्याने शिक्षक वर्गाकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पालघर : समाजातील प्रत्येक घटकास घडविण्याचे काम शिक्षक वर्गाकडून होत असते. मात्र पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून दुर्लक्षित केले गेले आहे. पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी होणारा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आज दीड महिना उलटून गेल्यावरही अजूनपर्यंत प्रलंबित ठेवल्याने शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून हा पुरस्कार सोहळा ५ सप्टेंबर रोजी होऊ शकला नाही, तरी तो आता 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिनी तरी घेण्यात यावा अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. 5 सप्टेंबर या शिक्षण दिनी पालघर जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रदान करणे जरुरी असताना गौरी विसर्जनाची रजा असल्याचे कारण देऊन हा पुरस्कार सोहळा 14 सप्टेंबर रोजी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे आचारसंहितेचे कारण देऊन तो आजतागायत प्रलंबित ठेवण्यात आला असल्याबद्दल हा पुरस्कार सोहळा करण्याबाबत कुठल्याही प्रकारची हालचाल शिक्षण विभागाकडून होत नसल्याने शिक्षक वर्गाकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पालघर जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार कोणाला जाहीर झाले आहेत. याबाबत ही शिक्षक विभागाकडून दीड महिना उलटून गेल्यावरही अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. राज्यातील बहुतांश जिल्ह्याने पुरस्कार प्रदान केले. मात्र पालघर जिल्हा परिषद अजूनपर्यंत नावे सुद्धा जाहीर करू शकलेली नाही.पाच सप्टेंबर संपूर्ण देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी रविवारची सुट्टी आली असली तरी अर्धवेळ शाळा ठेवून शिक्षक दिन सर्व ठिकाणी साजरा केला जातो. शिक्षकांचा सन्मान हा शिक्षक दिनी व्हायला हवा तरच त्याचे महत्त्व आहे. गौरी विसर्जनाचे कारण देऊ हा पुरस्कार पुढे ढकलण्यात आला. एक तास जरी शाळा सुरू ठेवली असती तरी त्या दिवशी शिक्षक आवर्जून उपस्थित राहिले असते. 5 सप्टेंबरला दिलेली सुट्टी ही पूर्णपणे चुकीची असल्याची भावना त्यावेळेस शिक्षकांनी व्यक्त केली होती. आता तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या पुरस्काराच्या बाबत लवकरात लवकर पावले उचलून हा सोहळा 11 नोव्हेंबर रोजी साजरा होणार्‍या शिक्षण दिनी तरी करावा अशी भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया.1
शिक्षक पुरस्कार हा 5 सप्टेंबरलाच करायला हवा त्याचे महत्त्व त्याच दिवशी आहे. राजकीय पुढार्‍यांना मिरवण्यासाठी हा पुरस्कार पुढे ढकलला गेला. राजकीय नेते व्यासपीठावर नसते तर काय फरक पडतो ते समोरच्या बाजूस ही बसू शकले असते. मात्र त्यांच्या सोयीच्या दृष्टीने आजतागायत हा पुरस्कार जिल्हा परिषद देऊ शकले नाही. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
पी. टी. पाटील – माजी अध्यक्ष, पालघर- ठाणे जिल्हा, माध्यमिक शिक्षक संघ व पतपेढी

प्रतिक्रिया.2
विद्यमान सरकार शिक्षकांना पुरस्कार देण्याबाबत करत असलेल्या टाळाटाळीला एक शिक्षक पुरस्कार प्राप्त म्हणून पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो. जर का वेळेवर पुरस्कार द्यायचा नसेल तर शिक्षकांची आणि शिक्षण क्षेत्राची अशी थट्टा भविष्यात कधीही करण्यात येऊ नये हा शिक्षकांचा घोर अपमान आहे. शासनाला वाटत असेल तर 11 नोव्हेंबर या शिक्षण दिनी तरी या पुरस्काराचे वितरण करावे.
संतोष पावडे, अध्यक्ष, पालघर- ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढी

- Advertisement -

प्रतिक्रिया.3
पाच सप्टेंबरचा पुरस्कार 14 सप्टेंबरला करण्याचे घोषित केले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आला. पालकमंत्र्यांशी अजूनपर्यंत संपर्क होऊ शकला नाही. तो झाला की त्यांच्याकडून तारीख घेण्यात येईल व तो दिवाळीनंतर हा पुरस्कार सोहळा करण्यात येईल.
वैदेही वाढाण, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -