पानवेली निर्यातीकरिता डहाणू लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी

माहीम भागातील पानवेली(खायचे पान) रेल्वे मार्गाने उत्तर भारतात पाठवण्याच्या मागणीच्या अनुषंगाने रेल्वे डीआरएम जिवीएस सत्यप्रकाश आणि खासदार राजेंद्र गावित हे शनिवारी केळवे येथे दौऱ्यावर आले.

केळवे माहीम भागातील पानवेली(खायचे पान) रेल्वे मार्गाने उत्तर भारतात पाठवण्याच्या मागणीच्या अनुषंगाने रेल्वे डीआरएम जिवीएस सत्यप्रकाश आणि खासदार राजेंद्र गावित हे शनिवारी केळवे येथे दौऱ्यावर आले. याप्रसंगी माकुणसारचे शाखाप्रमुख भुपेश म्हात्रे आणि रेल्वे प्रवासी यांनी डीआरएम आणि खासदार राजेंद्र गावित यांची भेट शनिवार (दि. २०) घेतली व त्यांना रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांचे आणि समस्यासंदर्भांतील निवेदन दिले. विरारवरून संध्याकाळी ६ ते ७:१० या १ तासापेक्षा अधिकच्या वेळेत डहाणूकरिता लोकल उपलब्ध नसल्याने दोन्ही लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या दोन्ही लोकलमध्ये एक नवीन डहाणू लोकल फेरी सुरू करण्यासंदर्भात तसेच डहाणू विरार लोकल सेवा सुरू होऊन ९ वर्षाचा काळ उलटला तरी डहाणू विरार लोकल फेऱ्यामध्ये वाढ मात्र झाली नाही. सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबईकडून डहाणूकडे येणाऱ्या लोकलमध्ये १ तासापेक्षा जास्त अंतर आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी विरार डहाणू लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्ग करीत आहे. त्या अनुषंगाने गर्दीच्या वेळी सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबई कडून येणाऱ्या लोकल फेरयामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांच्या वतीने डीआरएम यांच्याकडे करण्यात आली.

तसेच पालघर भागातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांचा मागण्याचा सहानभूतीपूर्वक विचार करून या भागातील रेल्वे समस्या सोडवण्याची मागणी डीआरयुसीसी सदस्य केदार काळे यांनी डीआरएम आणि खासदार यांच्याकडे केली. तसेच डहाणू ते वैतरणा रेल्वे स्थानकात असलेल्या विविध समस्या लवकरात लवकर सोडवून प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्याची मागणी खासदार गावित यांनी डीआरएम यांच्याकडे केली. करोना काळात बंद करण्यात आलेली सकाळची डहाणू विरार लोकल लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे डीआरएम यांनी सांगितले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजा ठाकूर, यतीन सावे, आणि प्रवासी उपस्थित होते.