महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची प्रतिनियुक्ती वादात

याप्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी वसई महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी शासन निर्धारित पद नियुक्तीचा कालावधी किमान तीन वर्षे; तर जास्तीत जास्त पाच वर्षे असतो. मात्र महेश माधवी यांचा नियुक्ती कालावधी जाणून घेण्यासाठी एचआर विभागाशी संपर्क करण्याचा सल्ला दिला.

वसईः शासन निर्धारित कालावधी उलटूनही पदावर कायम असल्याने वसई महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश कुमार माधवी यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भाजपचे तसनीफ शेख यांनी याबाबत मुख्य अभियंता (वाणिज्य) अधिकारी तक्रार निवारण कक्ष, मुख्य कार्यालय प्रकाशगड यांच्याकडे तक्रार केली आहे.महेश माधवी यांची वसई गाव कार्यालयात नियुक्ती होऊन पाच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. सध्या त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यकारी अभियंतापदाचा कारभार आहे. पदावरून बदली होत नसल्याने त्यांच्यामार्फत अनेक प्रकारची गैर व अवाजवी कामे निर्धारित मूल्यापेक्षा अधिक मूल्य घेऊन होत असल्याची शेख यांची तक्रार आहे. या भ्रष्टाचारात महावितरण कार्यालयातील कर्मचारीदेखील सामील असतात. हा व्यवहार कागदोपत्री असा केला जातो की, सामान्य माणसाला त्याचे आकलन होत नाही. त्यामुळे महेश माधवी यांच्या नियुक्ती दरम्यान झालेल्या कामाचा अहवाल मागवण्यात यावा. तसेच या प्रकरणात त्यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यास व शासन निर्धारित कालावधी समाप्त झाला असल्यास त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे. मागील आठवडाभरात वसई महावितरणे अनेक वीजचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. मात्र यातील बहुतांश प्रकरणांत महावितरणचे वायरमन, अभियंता व ठेकेदारच ग्राहकांना वीजचोरी करण्यास प्रवृत्त करत असल्याचे उघड झाले आहे. यातील सहभाग उघड झाल्यानंतर महावितरणने संबंधित कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली असली तरी ग्राहकांना वीजबिल व दंडाच्या रूपात भुर्दंड पडत असल्याने महावितरणविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, याप्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी वसई महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी शासन निर्धारित पद नियुक्तीचा कालावधी किमान तीन वर्षे; तर जास्तीत जास्त पाच वर्षे असतो. मात्र महेश माधवी यांचा नियुक्ती कालावधी जाणून घेण्यासाठी एचआर विभागाशी संपर्क करण्याचा सल्ला दिला.

 

वसई-विरार शहरातील बहुतांश महावितरणचे कर्मचारी सामान्य नागरिकांपेक्षा बांधकाम व्यावसायिक, कंपन्या आणि अन्य आस्थापनांना वीजमीटर लावून देण्यास प्राधान्य देत असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. विशेष म्हणजे सामान्य वीज ग्राहकांनी वीजबिल न भरल्यास महावितरण तात्काळ वीज कनेक्शन खंडित करते. मात्र महावितरणच्या कर्मचार्‍यांवर अशा पद्धतीची कारवाई करण्यात येत नाही. महावितरणचे कार्यकारी अभियंता महेशकुमार माधवी यांनीही तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटूनही वीजबिल भरलेले नव्हते. मात्र महावितरणने त्यांचा वीजमीटर कापण्याची साधी तसदीही घेतलेली नव्हती, अशी माहिती महावितरणमधीलच काही कर्मचार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.