उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २० मे रोजी पालघर जिल्हा दौरा

खासगी नेते मंडळींनी अनेक दौरे केल्यानंतर आता २० मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्ह्यातील डहाणू येथे एका बॅंकेच्या नवीन वास्तुच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत.

गेल्या काही महिन्यात पालघर जिल्ह्यात शासकीय समितींच्या दौऱ्या बरोबरच अनेक समितीचे दौरे झाले. मात्र खासगी नेते मंडळींनी अनेक दौरे केल्यानंतर आता २० मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्ह्यातील डहाणू येथे एका बॅंकेच्या नवीन वास्तुच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दौरा यशस्वीतेसाठी कार्यक्रमाच्या ठिकाणांची तसेच त्यासंबंधी करावयाची तयारी या संदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुनिल भुसारा यांनी पाहणी करुन पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजी आमदार आनंद ठाकूर उपस्थित होते.

शुक्रवार, २० मे रोजी सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे १०.३० वाजता बॅंकेच्या शाखांचे उद्घाटन केल्यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. यावेळी कसलीही शासकीय बैठक होणार नसून यानंतर शहापूरसाठी रवाना होणार असल्याचे समोर येत आहे. राज्यात सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाचा पवार हे अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने पालघरात येत असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता बैठकीत बैठकीत भुसारा यांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना वेळेत हजर राहण्याबरोबरच शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.

मुळात काही महिन्यांतच डहाणू आणि जव्हार नगरपरिषदांच्या निवडणुकाही लागण्याची शक्यता असल्याने या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात असून तशी वातावरण निर्मिती पालघर राष्ट्रवादीकडून होण्याची चिन्हे आहेत. यामुळे अजित पवार या दौऱ्यात नेमके काय भाष्य करणार पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीत नवे चैतन्य निर्माण होणार, हे नक्की. या दौऱ्याबाबत आमदार सुनिल भुसारा यांनी दुजोरा दिला असून दौरा होणार असल्याचे दैनिक आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

हेही वाचा –

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणानेच निवडणुका होणार, SCचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात काय होणार?