घर पालघर कांदळवनाची तोड करून विकासकामे

कांदळवनाची तोड करून विकासकामे

Subscribe

सदर ठिकाणी बेकायदा माती भराव, करून तिवरांची झाडे नष्ट करण्यात आलेली आहेत. याबाबतचा पंचनामा करण्यासाठी कौलार तलाठी जागेवर आले असता त्यांना पंचनामा करू दिला नाही.

वसई: वसईतील रानगावांत शासकीय जागेवर कांदळवन नष्ट केली जात आहेत. या जागेवर निषिद्ध क्षेत्र म्हणून महाराष्ट्र शासनाचा फलक लावला होता. तो गायब करून त्या जागेवर बांधकाम उभे करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली असता तलाठी , नायब तहसीलदार यांनी कारवाई सुरु केली. या कारवाईस काही भूमाफियांनी विरोध केल्याने कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. रानगाव येथील समुद्र किनार्‍यालगत सर्वे क्रमांक ३६ मधे कांदळवन आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाते. तशा स्वरूपाचा फलक महसूल विभागाने इथे लावला होता. सदर फलक गायब करून पत्तन अभियंता यांचा फलक लावून बांधकाम सुरु करण्यात आले. सदर ठिकाणी बेकायदा माती भराव, करून तिवरांची झाडे नष्ट करण्यात आलेली आहेत. याबाबतचा पंचनामा करण्यासाठी कौलार तलाठी जागेवर आले असता त्यांना पंचनामा करू दिला नाही.

आम्ही वसईकर संघटनेचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी पालघर, पोलीस आयुक्त, तहसीलदार वसई यांना संपर्क साधून प्रकरणाची गंभीरता स्पष्ट केल्यावर पोलीस बळ देण्यात आले. सदर विकासकाम तुर्तास बंद केले आहे. याविकास कामाचे आदेश पत्तन अभियंता नवी मुंबई यांच्याकडून देण्यात आले आहेत. आदेशानुसार मासे सुकवण्यासाठी कोबा ज्याचे विकास काम करण्याची जागा रामआळी रानगाव असे स्पष्ट नमूद असतानाही प्रत्यक्षात बांधकाम कांदळवन तोडून समुद्रालगतच्या खाडीत महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या जागेत करण्यात येत आहे. यासाठी १७ लाख ९९ हजार रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे.
शासनाची दिशाभूल करून तसेच कायदे मोडून अशा स्वरूपाची विकासकामे या भागात सुरु असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी पालघर यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत पत्तन विभाग नवी मुंबई यांनी महसूल विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. सदर परवानगी नसल्यास कंत्राटदार , अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -