वसईः आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला मारहाण करणार्या कामण आश्रमशाळेतील वसतीगृह अधिक्षकाची हकालपट्टी करण्यात आली आहे. कामण आश्रमशाळेतील ८ वीत शिकणार्या नितीन धनजी मागी या १४ वर्षीय विद्यार्थीला शाळेतील वसतीगृह अधीक्षक पृथ्वी बोरसे यांनी २ फेब्रुवारी रोजी रात्री बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले होते. मुळात निवासी आश्रम शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना शाळेकडून मोफत आरोग्य उपचार केले जातात. मात्र नितीनला शाळेने पालकांच्या ताब्यात देत, आपली जबाबदारी झटकुन टाकली होती. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. शेवटी शाळा व्यवस्थापनाने या मुलावर कासा उपजिल्हा रुग्णालय आणि वेदांत हॉस्पिटल येथे दाखल करून उपचार केले होते.
या घटनेबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर आदिवासी समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. युवा एल्गार आघाडीचे प्रमुख अॅड. विराज गडग यांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना पत्र देत दोषी शिक्षकांवर अनुसूचित जमाती प्रतिबंध कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. डहाणू सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुरेश बनसोडे, नरेंद्र संखे व सहकारी यांनी विद्यार्थ्याच्या घरी भेट देत विचारपूस केली आहे. विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीनंतर प्रचंड संताप व्यक्त होऊ लागल्याने आश्रमशाळा व्यवस्थापनाने अधिक्षक पृथ्वी बोरसे यांना कामावरून कमी केले आहे.