कारंज्यासाठी पालिकेकडून पिण्याच्या पाण्याची नासाडी

मिरा भाईंदर शहरात एकिकडे जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवलेले असताना काही भागात अजून पाणीपुरवठा पोहोचलेला नाही.

मिरा भाईंदर शहरात एकिकडे जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवलेले असताना काही भागात अजून पाणीपुरवठा पोहोचलेला नाही. अशा परिस्थितीत पालिकेने शोभेच्या कारंज्यासाठी पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत असताना दुसरीकडे पाणी जपून वापरा, सांगणाऱ्या मिरा भाईंदर महापालिकेकडूनच रोज पिण्याच्या पाण्याची नासाडी केली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. उन्हाळा तीव्र होऊ लागला, तसा पाणी टंचाईच्या झळा उग्र होऊ लागल्या आहेत. अनेक ग्रामीण भागात तर महिलांची हंडाभर पाण्यासाठी चालणारी पायपीट व धडपड दयनीय आहे. पालिकेच्या हद्दीत देखील पाणी टंचाई नेहमीची आहे. आधीच पाणी कमी त्यात जलवाहिनी फुटणे, दुरुस्तीसाठी शटडाऊन आदी कारणांनी पाण्याचा खेळखंडोबा होतो.

परंतु पालिका मात्र नगरसेवकांच्या हट्टाखातर नियमात नसणाऱ्या कामांसाठी मंजुरीपासून संरक्षण देण्याचे काम करत आहेत. भाईंदरच्या बालाजी नगरमध्ये रेल्वे स्थानक लगतच्या एकमेव पदपथावर नगरसेवक निधीतून वॉल गार्डनच्या नावाखाली बांधलेल्या कारंज्यांसाठी चक्क पिण्याच्या पाण्याची नळ जोडणी दिली गेली. पालिकेने नागरिकांना नळ जोडण्या बंद केल्या असताना कारंज्यांसाठी मात्र जोडणी दिली गेली. आता त्या कारंज्याचे पाणी रोज पदपथ व रस्त्यावर वाहून गटारात जात आहे. रोजचे पिण्याचे पाणी वाहून जात असताना नगरसेवकांसह पालिका प्रशासनाला त्याचे सोयरसुतक नाही. एरव्ही स्वतःला जागरूक म्हणवणारे स्थानिक कार्यकर्ते देखील गप्प आहेत. मुळात कारंज्यांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रक्रिया केलेले सांडपाणी किंवा तलाव वा विहिरीचे पाणी वापरणे अपेक्षित होते. परंतु पालिका तर चक्क पिण्याचे पाणी ठिकठिकाणी करंज्यासाठी वापरत आहे.

पदपथावर व रस्त्यावर पाणी वाहून ते ओले होतात. जागोजागी चिखल होतो. त्यामुळे पदपथावरून चालण्यास लोकांना शक्य होत नाही. एकूणच नगरसेवकांचा नियमबाह्य आणि लोकांना त्रासदायक ठरणारे हट्ट पुरवणाऱ्या प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची नासाडी थांबवण्याची अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा –

राज ठाकरेंच्या भोंग्याला पॉवर कुणाची?, खासदार संजय राऊतांचा टोला