जव्हार : जव्हार तालुक्यातील बहुसंख्य नागरिक हे दिवाळी सणानिमित्त स्वस्त आणि सुरक्षित प्रवास असणार्या एसटीचा वापर करतात. येथील नागरिक हे शहरांत निरनिराळ्या कामासाठी जात असतात. परंतु, एसटी महामंडळाने ऐन दिवाळीत १० टक्के भाडे वाढ केल्याने या हंगामी तिकीट दर वाढीने ग्राहकांच्या खिशावर ताण पडला आहे. महिलांसाठी सवलत असली तरी, त्यांना तिकिटासाठी नियमित रकमेपेक्षा जास्त पैसे द्यावे लागत असल्याने महिलांनी या सणात भाडे वाढ होऊ नये असे म्हटले आहे. राष्ट्रीय सण दिवाळी महामंडळासाठी गर्दीचा हंगाम म्हणून ओळखला जातो.या काळात शाळा-महाविद्यालये,खासगी आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी असते. या काळात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होते. एसटी महामंडळाने दिवाळीपूर्वी ७ ते २७ नोव्हेंबरपर्यंत हंगामी तिकिटात दरवाढ केलेली आहे. दिवाळीनिमित्त प्रवाशांची गर्दी अधिक असते. यंदा या हंगामाचा फायदा करून घेण्याची तयारी महामंडळाकडून करण्यात आली असून हंगामी दरवाढीसाठी एसटी महामंडळाला आगारनिहाय उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. किलोमीटरपासून ते उत्पन्न अशा वेगवेगळे उद्दिष्ट दिलेले आहे. सध्या महिलांना दिलेली तिकीट दरात सुटीमुळे महामंडळाचे उत्पन्न बर्यापैकी वाढले असल्याचे जव्हार आगारातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे दरवाढीनंतर महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत आहे.
सुरक्षित आणि शाश्वत सेवा देणार्या लाल परीच्या दरात ऐन दिवाळीत भाडे वाढ झाल्याने, आर्थिक नियोजन करताना खिशावर ताण पडत आहे. प्रवाश्यांना ऐन दिवाळीत अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.
-सुवर्णा घोघारी, गृहिणी
राज्याची प्रवास धमणी लाल परी म्हणजे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. माझ्या माहेरी जाताना माझी एस टी म्हणजे मला माझी सखी वाटते. आधीच तोट्यात आलेल्या एसटीची दिवाळीत भाडे वाढ केली तरी, एसटी ची सेवा खूप सुरक्षित आणि आनंददायी आहे.
– विशाखा साळवे, माजी नगरसेविका