कोणी काम देता का काम !

सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, वन विभाग या विभागाकडून दरवर्षी रोजगार हमीची कामे सुरु होत असतात, मात्र आजतागायत पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकही काम सुरू करण्यात आलेले नाही.

वाडा : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खरिप हंगामात एकमेव भात पीक घेतले जाते. या पिकाचा हंगाम संपल्यानंतर रब्बी हंगामात फारशी मजुरांची आवश्यकता भासत नाही. सध्या भात पिकाचा हंगाम संपल्याने येथील हजारो मजुर रोजगाराच्या शोधात फिरत आहेत. बरेचसे मजूर वीटभट्टी व्यवसाय, बांधकाम व्यवसायासाठी कल्याण, भिवंडी, ठाणे, वसई या शहरी भागात स्थलांतर करु लागले आहेत. येथील वाढते स्थलांतर रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यात तातडीने रोजगार हमीची कामे सुरू करण्यात यावीत अशी मागणी विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी विभागाकडून पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यात गतवर्षी रोजगार हमीच्या माध्यमातून 3089 हेक्टर क्षेत्रातील जुन्या भातशेतीमध्ये बांधबंधिस्ती तसेच अन्य दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. यावर्षी डिसेंबर महिना सुरु झाला तरी अजूनपर्यंत एकही काम कृषी विभागाकडून काम सुरू झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, वन विभाग या विभागाकडून दरवर्षी रोजगार हमीची कामे सुरु होत असतात, मात्र आजतागायत पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकही काम सुरू करण्यात आलेले नाही.

 

बांधबंधिस्तीच्या कामांना प्राधान्य द्यावे

गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकर्‍यांच्या शेत जमिनीचे बांध वाहून गेले आहेत. शेतजमिनीमध्ये झालेल्या नुकसानीची दुरुस्ती रोजगार हमीच्या माध्यमातून करण्यात यावी अशी मागणी येथील शेतकर्‍यांची आहे.

 

सातत्याने येणार्‍या नैसर्गिक आपत्तीत येथील शेतकरी डबघाईस आला आहे. तो स्वखर्चाने बांधबंदिस्ती करु शकत नाही. शासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून ही कामे करून द्यावीत.
– राजेश सातवी,पंचायत समिती सदस्य