चालक-वाहक कामावर एक तास उशिरा; प्रवाशांची गैरसोय

ठाणे पालघर दरम्यान धावणारी वाडा आगाराची बस शुक्रवारी चालक वाहक आणि कामावर उशिरा आल्यामुळे प्रवाशांना तब्बल एक तास बसमध्ये ताटकळत बसावे लागले.

ठाणे पालघर दरम्यान धावणारी वाडा आगाराची बस शुक्रवारी चालक वाहक आणि कामावर उशिरा आल्यामुळे प्रवाशांना तब्बल एक तास बसमध्ये ताटकळत बसावे लागले. वाडा आगाराची बस (क्रमांक एमएच ०७ सी ७५१५) ही सकाळी ठाणे येथून वाडामार्गे पालघर या मार्गावर चालवली जाते. ही बस एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणारी असल्याने साहजिकच गाडी प्रवाशांनी भरलेली असते. ही बस दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे वाडा बस स्थानकात आली. मात्र चालक व वाहकाची कामगिरी संपल्यामुळे ते दोघेही बसमधून उतरले. दुसरा चालक, वाहक आल्यावरच बस पुढच्या प्रवासाला निघेल असे सांगून दोघेही निघून गेले.

वाडा आगारात सध्या ३९ गाड्या आहेत. त्यापैकी दोन-चार गाड्या नेहमीच नादुरुस्त असतात. कर्मचारी संख्याही कमी असल्याने असा गोंधळ होतो. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही प्रमाणात बससेवा वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत.
– मधुकर धांगडा, आगार व्यवस्थापक, वाडा

दरम्यान, बसमधील काही प्रवाशांनी वाडा स्थानकातील नियंत्रकाकडे तक्रार केली असता त्यांनीही वाहक चालक आल्याशिवाय बस पुढे जाणार नाही. ते दोघेही लवकर येतील व गाडी सोडली जाईल, असे सांगितले. आता प्रवाशांना त्या दोघांची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही, असे समजून नाईलास्तव चालक व वाचकांची वाट पहात एक तासभर ताटकळत बसावे लागले. अखेर एका तासानंतर वाहक व चालक कामगिरीवर हजर झाले. या दरम्यान प्रवाशांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. तर काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचा वेळ वाया गेला. संतप्त प्रवाशांनी कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा –

Apple Truck accident : ठाण्यात काश्मिरी सफरचंदचा ट्रक उलटल्याने वाहतूक विस्कळीत