वसईः नालासोपारा शहरात अमली पदार्थ्यांची तस्करी करणार्या बिश्नोई गँगच्या पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २१ लाखाचे एमडी हस्तगत करण्यात आले आहे. याटोळीचा म्होरक्या फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नालासोपारा शहरातील दत्त नगरमधील दत्त आशिर्वाद इमारतीमधील सदनिका क्रमांक ३०२ मध्ये मिळालेल्या माहितीनुसार तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी आपल्या पथकासह छापा टाकला. या धाडीत पोलिसांनी दिनेशकुमार बिश्नोई (३१), सुनील बिश्नोई (३०), ओमप्रकाश किलेरी (३०), लादुराम बिश्नोई (४०) आणि प्रकाशकुमार बिश्नोई (२३) पोलिसांच्या हाती लागले. त्यांची झाडाझडती घेतली तेव्हा त्यांच्याजवळ २१० ग्राम वजनाचा २१ लाख रुपये किंमतीचा एमडी नावाचा अमली परार्थ आढळून आला.
हाती लागलेले सर्वच आरोपी हे सराईत बिश्नोई टोळीचे सदस्य आहेत. यागुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रकाश भोदू फरार असून त्याचा शोध तुळींज पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, आशफाक जमादार यांनी केली.