पालघर: भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान विभाग मुंबई, द्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार, वायव्य बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह पालघर जिल्ह्यातही पुढील चार दिवस ६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान विजांचा कडकडाट, मेघ गर्जना व वादळी वार्यासह (३० ते ४० किमी प्रति तास) तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार व सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मेघ गर्जना व वादळी वार्यासह जोरदार ते अति जोरदार स्वरूपात पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असल्याने तुमच्या भागात वीज पडणार की नाही याची अगोदरच माहिती मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून मोबाईलमध्ये दामिनी अॅप डाऊनलोड करण्याची सूचना करण्यात आली आहे. या अॅपमुळे शेतकरी आणि इतर नागरिकांना वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाच्या १५ ते अर्धा तास आधी अचूक अंदाज मिळतो.
त्यामुळे या अॅपच्या मदतीने सतर्कता बाळगून स्वतःचे संरक्षण करावे व जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, येथील कृषि हवामान शास्त्रज्ञ् रिझवाना सय्यद यांनी दिली आहे. विजांचा कडकडाट, मेघ गर्जना आणि वादळी वार्यासह जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने शेतकरी बांधवांनी खते देणे व फवारणीची कामे पुढे ढकलावी. जोरदार स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता असल्याने भात खाचरातील पाण्याची पातळी ५-१० से.मी. पर्यंत नियंत्रित करावी व अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. रोपवाटिका, भाजीपाला क्षेत्र व नवीन फळबाग लागवड केलेल्या क्षेत्रातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. गणपती उत्सवाच्या निमित्ताने काढण्यात येणार्या भाजीपाला, फुले व फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी व व्यवस्थित विक्रीसाठी पाठवावे, हा सल्ला कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.