भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात असलेल्या पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून दिव्यांगांना प्रमाणपत्र देणार्या तज्ञ डॉक्टरची जागा रिक्त आहे. जोशी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे दिव्यांगांना प्रमाणपत्र देणे बंद करण्यात आले आहे. परिणामी दिव्यांगांना त्रास सहन करत प्रमाणपत्र घेण्यासाठी ठाण्याला जावे लागत आहे. यामुळे शहरातील दिव्यांगांची सरकारी योजनांचा लाभ घेताना मोठी गैरसोय होत आहे. मीरा -भाईंदर शहरात दिव्यांगांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील दिव्यांगांना काही वर्षांपूर्वी प्रमाणपत्र घेण्यासाठी ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात जावे लागत होते. यामध्ये दिव्यांगांना त्यांची आर्थिक परिस्थिती व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे राज्य शासनाकडे हस्तांतरित केल्यानंतर या रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आल्याने दिव्यांगाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दिव्यांग व मतिमंद अशी दोन्ही प्रमाणपत्रे दिली जातात. परंतु गेल्या दिड – दोन महिन्यापासून हे प्रमाणपत्र देणार्या तज्ज्ञ डॉक्टरची जागा रिक्त आहे. त्यामुळे या रुग्णालयात प्रमाणपत्र देण्याचे बंद करण्यात आले आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी डॉक्टरची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आठवड्यातून एक दिवस डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य ओमप्रकाश गडोदिया यांनी केली आहे. याबाबत बोलताना जोशी रुग्णालयात तज्ञ डॉक्टर कंत्राटी पद्धतीने पूर्ण वेळ किंवा आठवड्यातील काही दिवस तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. दिव्यांगांना होणारी गैरसोय लवकरच दूर केली जाईल,असे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी सांगितले.