अवकाळी पावसाने मोखाडा तालुक्यातील बळीराजाच्या पिकांची वाताहात

गेल्या आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि मध्येच होणारी पावसाची जोरदार बरसात यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून उरले सुरले पीकही पावसामुळे उध्वस्त झाले आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि मध्येच होणारी पावसाची जोरदार बरसात यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून उरले सुरले पीकही पावसामुळे उध्वस्त झाल्यामुळे खोडाळा परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे वाया गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. मोखाडा तालुक्यातील खोडाळ्यासह आडोशी, बोटोशी, डोल्हारा, वाकडपाडा, कारेगाव, कडूचीवाडी, किनिस्ते, कोचाळे आदी ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावून पिकांची अक्षरशः वाट लावली. तसेच सावरपाडा, वाघ्याचीवाडी, देवबांध, गोमघर, वाशिंद, जोगलवाडी येथील भात, नागली व वरईची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली.

मागील वर्षांपासून पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. ग्रामीण भागातील भातशेती आटोपली असली तरी मात्र झोडपणीचे कामे बाकी असल्याने पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. कापणी केलेली पिकांची कणसे चांगल्या प्रकारे वाळवण्यासाठी शेतात ठेवण्यात आली होती. त्यानंतर या कणसाचे भारे तयार करून ठेवण्यात येणार होते. परंतु पावसाने हजेरी लावल्यामुळे कापणी करून ठेवण्यात आलेले सर्व पीक भिजून गेले आहे. मागील वर्षीसुद्धा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अशीच दाणादाण उडवली होती.

दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाला तोंड द्यावे लागत असून अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. लागवडीसाठी केलेला खर्चही भरून निघणे अवघड होऊन बसत आहे. परिणामी निसर्गाचा लहरीपणा असाच नियमितपणे सुरू राहिल्यास नागली, वरईप्रमाणेच भातशेतीही करणे विरळ होऊन बसेल.
– ठकूबाई निवृत्ती दोंदे, खोडाळा, शेतकरी

यावर्षीसुद्धा पुन्हा तसेच चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे आता कापणी केलेल्या भात पिकांची कणसे पाण्यातून उचलून शेताच्या बांधावर नेऊन ठेवण्याचे काम सुरू केले आहे. लागवडीपासून ते भात कापणीसाठी केलेला खर्च ही वाया गेला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. आता ही भिजलेली कणसे उचलून जे काय उत्पादन मिळेल त्यावरच आता अवलंबून आहोत. त्याचबरोबर इतर पिकांवरही याचा परिणाम झाला असल्याचे दिसत आहे.

दिवाळी संपली की थंडीचा मोसम सुरू होतो आणि हुडहुडी भरू लागते. यंदा मात्र त्याऐवजी बेमोसमी पाऊस सुरू असल्याने त्यातून होत असलेल्या पीक-पाण्याच्या नुकसानीमुळे शेतकरी आणि महागाईमुळे सर्वसामान्य माणसाला हुडहुडी भरण्याची वेळ आली आहे. नोव्हेंबर सरला तरी परतीची वाट न पकडलेल्या पावसाने खोडाळा परिसरातील भात पिकांची दाणादाण उडवली आहे.

खोडाळा परिसरातील आदिवासी शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भात, नागली आणि वरई या पिकांची लागवड करत असतो. वर्षांतून फक्त एकदाच ही पिके घेतली जातात. त्यातही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून उरल्या सुरल्या पिकांचीही नासाडी अवकाळी पावसाने केल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. परिणामी बारा महिन्यातील इतर महिन्यांसाठी पोटाची गुजराण करण्याकरता आदिवासी भागातील मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ लागते.

हेही वाचा –

महाराष्ट्र सरकारनं शेजारच्या राज्यांच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा अभ्यास करावा – शरद पवार